बदलापूर : बदलापूरमधील राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामले प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आलीय. याप्रकरणी आणखी सहा जणांना अटक करण्यात आलीय. मात्र, दामले फरार आहे.
दामलेच्या सहा साथीदारांना कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केलीय. काल दामलेचा एका सहका-याला अटक करण्यात आली होती. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. मात्र याप्रकरणी मुख्य आरोपी असलेला आशिष दामले अजूनही फरार आहे. आशिष दामलेला अटक कधी होणार असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.
राष्ट्रवादी नगरसेवक आशिष दामलेच्या गुंडगिरीमुळं बदलापूर पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मात्र राजकीय गुंडगिरीची ही काही पहिलीच घटना नाही. बदलापूरच्या इभ्रतीला गालबोट लागले आहे.
बदलापूर. डोंबिवलीनंतर सांस्कृतिक शहर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारं बदलापूर. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत इथं जो राजकीय हिंसाचार उसळलाय, त्यामुळं बदलापूर बदनाम झालंय.
आरटीआय कार्यकर्ते अरुण सावंत आणि वांगणी येथे शिवसेना नेते रवी पाटील यांची हत्या झाली. २०१३ मध्ये बदलापुरातील भाजपचे माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र प्रदेश कामगार संघटना सरचिटणीस शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. २०१४ मध्ये गांधी चौक परिसरात भरदिवसा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर उपाध्यक्ष योगेश राऊत याच्यावर गोळीबार करण्यात आला. एप्रिल २०१४ मध्ये बदलापूर शिवसेनेचे उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांची दोन अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली. एप्रिल २०१५ मध्ये कुळगाव बदलापूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपशाखाप्रमुख अणि रिक्षा चालक केशव मोहिते याची निर्घृण हत्या करण्यात आली.
आता राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामले या एका सुशिक्षित राजकारण्याचा खरा चेहरा cctv मुळे जगासमोर आलाय. शहरावरून राजकीय गुन्हेगारीचा नांगर फिरत असताना इथल्या लोकांचं दैनंदिन जीवन मुश्कील झालंय. हे सर्व रोखण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरत असल्यानं कसं जगायचं, असा प्रश्न बदलापूरकरांना पडलाय.
आशिष दामलेसारखे राजकीय गुंडे पोलीस संरक्षणातच गुंडगिरी करतायत. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही. बदलापूरमधला हा सूडाग्नी कधी थांबणार, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.