उडणाऱ्या पक्षाच्या नजरेतून पाहा चिंतामणीचे थेऊर...

थेऊर...मुळा-मुठेच्या काठावर वसलेलं चिंतामणी विनायकाचं गाव... पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटरवर थेऊर गाव वसलंय... अष्टविनायकामधला पाचवा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी विनायक...

Updated: Sep 14, 2016, 04:49 PM IST
उडणाऱ्या पक्षाच्या नजरेतून पाहा चिंतामणीचे थेऊर... title=

थेऊरच्या चिंतामणीचे माहात्म

ब्रम्हासृष्ठ्यादिसक्त स्थिरमतिरहित: पीडितो विघ्नसंधै ! आक्रांतो भूतिरक्त कृतिगुणरजसा जीवना त्यत्कुमिच्छन!!

स्वात्मानं सख्यभक्त्या गणपतिममलं सेव्यचिंतामणीयम ! मुक्तश्चास्थापयंतं स्थिरमतिसुखदं स्थावरे ढुंढि मीडे !!

जाहिरातीखाली व्हिडिओ आहेत...

 

कुठे आहे चिंतामणीचे थेऊरगाव..

थेऊर...मुळा-मुठेच्या काठावर वसलेलं चिंतामणी विनायकाचं गाव... पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटरवर थेऊर गाव वसलंय... अष्टविनायकामधला पाचवा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी विनायक...थेऊरचा गणपती असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान स्थान आहे...श्री गणेश पुराणात चिंतामणी विनायकाच्या जन्माची कथा सांगण्यात आलीय... गौतम ऋषींनी दिलेल्या शापातून मुक्तता होण्यासाठी इंद्रदेवांनी ज्याठिकाणी बसून तपश्चर्या केली त्याठिकाणी त्यांनी श्रीगणेशाची स्थापना केली, तोच गणपती पुढे चिंतामणी विनायक म्हणून मान्यता पावल्याचं सांगतात. दुसरी कथा कपिल ऋषींचं रत्न हिरावून नेणा-या गणराजाविषयीची आहे. हे रत्न परत मिळवण्यासाठी विनायकानं गणराजाला ठार केलं. मात्र त्यानंतर कपिल ऋषींनी ते रत्न स्वीकारलं नाही. ज्या कदंब वृक्षाखाली ही घटना घडली तिथेच विनायक हा चिंतामणी बनून वास्तव्य करू लागल्याचं सांगतात. त्या गणेशाची ही स्वयंभू मूर्ती आहे.

 

चिंचवडचा संबंध...

चिंतामणी विनायकाच्या दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. दूर-दूरहून आलेले भाविक भक्त चिंतामणीला अभिषेक घालतात. त्याच्या दर्शनानं मनातील चिंता, क्लेश दूर होऊन प्रसन्नता लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे.     

गणेशाचे चिंचवडमधील असीम भक्त श्री चिंतामणी यांनी चिंतामणी विनायकाचं मूळ मंदिर बांधलं... त्यानंतर सुमारे शंभर वर्षांनी श्रीमंत माधवराव पेशव्यांनी मंदिरासमोर भव्य मंडप बांधून त्याच्या सौंदर्यात भर टाकली... मंदिरावरील कारागिरी आकर्षक आहे. चिंतामणीच्या मंदिराचा महादरवाजा उत्तराभिमुख असून गाभा-यातली श्रींची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. अतिशय सुबक तसंच रेखीव मूर्तीची सोंड डाव्या बाजूला आहे. सभामंडपातील गणेशाची विविध रूपं खरोखरीच लक्ष वेधून घेतात. गणपती मंदिराच्या आवारात विष्णूलक्ष्मी, महादेव मंदिर तसंच हनुमान मंदिर अशी जुनी मंदिरंही आहेत. या सगळ्यामुळे थेऊरगावाला मोठं धार्मिक माहात्म्य प्राप्त झालंय.

 

माधवराव पेशवेही दर्शनाला यायचे...

श्रीमंत थोरले माधवराव पेशव्यांची चिंतामणी विनायकावर अपार भक्ती होती. या गणपतीच्या दर्शनासाठी ते नेमानं यायचे. ब-याचदा त्यांचं थेऊरगावी वास्तव्यही असायचं. मंदिरापासून जवळच त्यांच्या वाड्याचे अवशेष बघायला मिळतात. त्यांनी मंदिरामध्ये ज्या ठिकाणी देह ठेवला त्याठिकाणी त्यांची पालखी आजही ठेवलेली आहे. मंदिराच्या आवारातील दीपमाळ तसंच महाकाय घंटा लक्ष वेधून घेतात. त्याचप्रमाणं इथल्या विविध प्रतिकांच्या आकारातील दानपेट्याही खूपच आकर्षक आहेत.

 

मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप...

मंदिर परिसराला नेहमीच जत्रेचं स्वरूप आलेलं असतं... दिवसाकाठी हजारो गणेशभक्त चिंतामणीच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या येण्यानं गावक-यांच्या उदरनिर्वाहाचीही चिंता काही प्रमाणात मिटते... अशावेळी भाविकांच्या कपाळावर गंध लावणारा शाळकरी मुलगादेखील दिवसाला शंभरएक रुपयांची कमाई घरी घेऊन जातो.

मंदिरातून बाहेर पडल्यावर मुळा - मुठा नदीच्या काठी सतीचं वृंदावन म्हणून एक स्थळ आहे. श्रीमंत माधवरावांची समाधी याठिकाणी आहे. त्याची देखभाल देवस्थानच्या माध्यमातून केली जाते. हे स्थळ देखील थेऊरमधील धार्मिक तसंच ऐतिहासिक पर्यटनाचा भाग आहे.   

 

मूलभूत सुविधांचा अभाव...

मुळा - मुठेच्या काठावरील व्याघ्रशिळा हे थेऊरमधील काहीसं दुर्लक्षित स्थान म्हणावं लागेल. इथपर्यंत पोहचण्यासाठी चांगला रस्ता देखील नाहीये. देवस्थानतर्फे या शिळेवर मेघडंबरी उभारण्यात आलीय. या व्याघ्रशिळेविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यामुळे काही गणेशभक्त अवघड वाट तुडवत आवर्जून इथं पोहचतात.

गावाच्या बाहेर बाभुळवनात ग्रामदेवता महातारिणीचं देऊळ आहे. गावातील विविध धार्मिक उत्सवाचं आयोजन याठिकाणी होत असतं. तर एकूणच धार्मिक वातावरणानं व्यापलेला हा संपूर्ण परिसर... थेऊरला आलेल्या भक्तांना त्याची आपसूक प्रचिती आल्याशिवाय राहत नाही...

 

उसाची शेती...

बारमाही वाहणा-या नदीमुळं गावात ब-यापैकी सधनता आहे... शेती तसंच इतर व्यवसायांमधून गावक-यांची क्रयशक्ती नजरेस पडते. सर्वदूर ऊस तसंच फळबागा पाहायला मिळतात... असं असताना परिसरातील ऊस शेतीचा आधार असेलला इथला यशवंत सहकारी साखर कारखाना गेली कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहे. तुटीत निघाल्यामुळं गाळप बंद असून तो पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाहीये. इतकंच काय तर हा कारखाना कुणी विकत घ्यायलाही तयार नाही. त्यामुळे जमीन विक्रीच्या हालचाली मागील काही काळापासून सुरू आहेत. असो... इतर गावांप्रमाणं त्याठिकाणच्या नागरी समस्या थोड्या फार फरकानं सारख्याच आहेत...

 

वाहतूक अडचणीची...

सोलापूर रस्ता आणि नगर रस्ता या दोन महामार्गांना जोडणारा रस्ता थेऊरमधून जातो. तो अगदीच अरुंद असल्यानं अवजड तसंच असुरक्षित वाहतुकीचा ताण त्यावर असतो. त्यामुळेच अगदी गावाच्या वेशीपाशी रस्त्याची चाळण झालेली बघायला मिळते... मात्र इथल्या नागरिकांना तसंच कारभा-यांना या सगळ्या गोष्टी अंगवळणी पडल्याचं जाणवतं... खरं कौतुक वाटतं ते इथल्या चिमुकल्यांचं... फारशी समज नसली तरी त्यांना त्यांचं गाव खूप छान वाटतं... त्यांच्याशी बोलल्यावर गावातील नेमका आजारही ध्यानात येतो... गावाच्या शिवारात मनसोक्त बागडणारी सुप्रिया तर खरोखर कमालच आहे... स्वतःमध्ये काहीतरी विशेष दडलेल्या या मुली देशाचं ख-या अर्थानं भवितव्य ठराव्यात अशा आहेत.

 

तेजोमय प्रकाशासारखं..

असं हे गणेश भाविकांच आवडतं, आणि साक्षात देवादिकांनीही वरदान देणा-या  श्री चिंतामणी विनायकाचं थेऊर गाव... पुराणातल्या कथेप्रमाणं साक्षात ब्रम्हदेवाने सांगितलेलं चित्तस्थैर्याची शीघ्र सिद्धी देणारे स्थावर क्षेत्र असं या ठिकाणाचे महात्म केवळ पोथ्या पुराणात अडकलेलं नाही.. बदलत्या काळातही या क्षेत्राचं मांगल्य तेवढचं उठून दिसतय.. चिंतामणीच्या गाभा-यातल्या तेजोमय प्रकाशासारखं..

 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या अष्टविनायक गणपतीचे आपण नेहमी जमिनीवरून दर्शन घेतले आहे. पण आता या गणपतीच्या परिसराचे मनमोहक आकाशातून दर्शन सर्व गणेश भक्तांना करून देण्याची  दोन अवलियांनी एक भन्नाट प्रयत्न केला आहे.

सुशांत कोयटे, श्रीकांत झवर या युवकांच्या झॉन मीडियाने अष्टविनायकांचं आकाशातून दृश्य टिपलं आहेत,  मोरेश्वराचं मोरगाव पाहिलं तर आता सिद्धटेकचा सिद्धिविनायकाचे आकाशातून दर्शन देणार आहोत.

सुशांत कोटे आणि श्रीकांत झवर हे दोन तरूण मूळ आयटी क्षेत्रातील असून ते अमेरिका आणि इंग्लड या ठिकाणी आयटी क्षेत्रात कार्यरत होते. पण आपल्या देशात आपल्या मातीत काही तरी नवीन करावे या उद्देशाने झपाटून झॉन मीडिया स्थापन केली. कोणत्याही कामाच सुरूवात श्रीगणेशाची वंदन करून केली जाते. त्यामुळे त्यांनी आपला पहिला प्रॉजेक्ट हा गणपतीचाच असला पाहिजे असे ठरविले.

त्यामुळे गेल्या चार ते पाच महिन्यापासून महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या ठिकाणी या दोघांची भटकंती सुरू असून यातून कोणताही व्यावसायिक दृष्टीकोन त्यांनी ठेवला नाही. अष्टविनायकाच्या प्रोजेक्टपासून सुरूवात करायची असे सुशांत आणि श्रीकांत यांनी ठरवूले. यासाठी आवश्यक ती सामुग्री घेऊन हे तरूण निघाले अष्टविनायकाला आकाशातून टीपायला.

या अवलियांनी अष्टविनायकाचे शुटिंग पूर्ण झाले असून त्याचा पहिला व्हिडिओ त्यांनी मोरगावचा मोरेश्वर यूट्यूबवर टाकला. असे मोरगाव आपण कधीच पाहिले नव्हते. झी २४ तासने सुशांत कोटे आणि श्रीकांत झवर यांच्याशी संपर्क साधला. आपल्या या अभिनव प्रकल्पाबद्दल ते भरभरून बोलत होते. अमेरिकेतून परतल्यावर काही तरी वेगळं काम करण्याचं आम्ही ठरवलं त्यानुसार हा प्रोजेक्ट हातात घेतला. यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागल्या. अनेकांना विनंती करावी लागली. आमचा कमर्शिअल उद्देश नसल्याचं सांगावं लागलं. मग आम्हांला शुटिंगला परवानगी मिळाली.

या सर्व कार्यात मंदिराच्या ट्रस्टींनी खूप मदत केली. त्यांनी आम्हांला शुटिंगला खूप मदत केली. आकाशातून शुटिंग करताना खूप मजा आली. परदेशात असताना खूप रिसर्च केला होता. यात होल अँड सोल आम्ही आहोत. शुटिंग, एडिटिंग, ग्राफिक्स आणि म्युझिक कम्पोज या सर्व गोष्टी आम्हीच केल्याचे श्रीकांत झवर यांनी सांगितले.

मूळचे कोपरगावचे असलेले सुशांत कोटे यांनी अमेरिका पाहिली होती पण कोकणात जाण्याचा त्यांचा कधी योग आला नव्हता. पण अष्टविनायकातील काही गणपती कोकणात असल्याने पहिल्यांदा निसर्ग सौंदर्याने नटलेला कोकण पाहिला आणि कोकणाच्या प्रेमातच पडलो. आम्ही शुटिंग केली त्यावेळी पावसाळा सुरू होता. त्यामुळे शुटिंग करण्यात आणखी मजा आली. आपला देशात असं वातावरण असतं हे कधी विचारही केला नव्हता, असे कोटे यांनी सांगितले.