मुलं शाळेत पोहोचल्याची माहिती आता देणार एस.एम.एस!

Updated: Nov 23, 2014, 06:55 PM IST
मुलं शाळेत पोहोचल्याची माहिती आता देणार एस.एम.एस! title=

बदलापूर : आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत पोहोचत नाही, तोपर्यंत पालकांना मोठी चिंता असते. दररोज शाळेत फोन करून विचारणं किंवा स्वत: शाळेत मुलांना सोडायला जाणं नोकरी करणाऱ्या आईवडिलांना शक्य नसतं. तसंच मुलगा किंवा मुलगी शाळेतून घरी येईपर्यंतही ही चिंता असतेच, मात्र बदलापूर इथल्या शिवभक्त शाळेनं पालकांची हीच चिंता समजून एक नवी यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेमार्फत विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत विद्यार्थी आल्यावर ‘एसएमएस’द्वारे माहिती मिळणार आहे. तसंच शाळा सुटल्यावरही हा एसएमएस जाणार आहे. त्यामुळं पालकांची चिंता कमी होण्यास मदत होईल.

बदलापूर-वडवली इथल्या शिवभक्त मराठी शाळा आणि सिंड्रेंल इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं शाळेचे व्यवस्थापक राहुल भावे यांनी विकसित केलेल्या ‘स्टुडंट रिकग्नाइज सिस्टिम’ हे नवीन सॉफ्टवेअर विकसित केलं आहे. याचा वापर शाळेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून ही पध्दत शाळेत सुरू करण्यात आली.

शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रात एक इलेट्रॉनिक चीप बसवण्यात आली आहे. विद्यार्थी शाळेच्या आवारात असलेल्या डिव्हाइसच्या आत आत आल्यावर पालकांच्या मोबाइलवर एसएमएस जातो. या एमएसएममध्ये विद्यार्थी किती वाजता शाळेत आला, याची वेळेसह अचूक माहिती मिळणार आहे. ही सेवा अत्यंत माफक दरात उपलब्ध करण्यात आली असून, अवघा १ रुपयात उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.