जलस्त्रोतांचं संवर्धन करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता

ठाणे, कल्याण भिवंडी सारख्या शहरांनाही सध्या पाणीटंचाईनं ग्रासलंय. मात्र असं असताना राज्यात अस्तित्वात असलेल्या जलस्त्रोतांचं संवर्धन करण्याबाबत मात्र प्रशासन कमालीची उदासीनता बाळगताना दिसून येते आहे. अंबरनाथ पश्चिमेकडील खुंटवली परिसरात असलेल्या उजाड डोंगरावरची ही वन खात्याची जमीन आहे. या डोंगरावर 4 ते 5 जीवंत झरे आहेत. तसंच डोंगराखाली एक नैसर्गिक तलावही आहे. 

Updated: Apr 20, 2016, 06:15 PM IST
जलस्त्रोतांचं संवर्धन करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता title=

अंबरनाथ : ठाणे, कल्याण भिवंडी सारख्या शहरांनाही सध्या पाणीटंचाईनं ग्रासलंय. मात्र असं असताना राज्यात अस्तित्वात असलेल्या जलस्त्रोतांचं संवर्धन करण्याबाबत मात्र प्रशासन कमालीची उदासीनता बाळगताना दिसून येते आहे. अंबरनाथ पश्चिमेकडील खुंटवली परिसरात असलेल्या उजाड डोंगरावरची ही वन खात्याची जमीन आहे. या डोंगरावर 4 ते 5 जीवंत झरे आहेत. तसंच डोंगराखाली एक नैसर्गिक तलावही आहे. 

विशेष म्हणजे आजूबाजूला भीषण पाणी टंचाई असताना या ठिकाणी बारमाही पाणी वाहत असतं. असं असतानाही हा अमुल्य जलसाठा दुर्लक्षित राहिलाय. वृक्षतोडीमुळे सध्या हे डोंगर बोडके झालेत. मात्र सुदैवानं अजूनही हा भाग अतिक्रमणापासून दूर राहिलाय. डोंगराच्या पलीकडे कोणतीही औद्योगीक वसाहत नसल्यामुळे हे जलस्त्रोत प्रदुषणमुक्त आहेत. डोंगराखाली रहाणारे काही रहिवासी या पाण्याचा वापर करतात मात्र या जलस्त्रोतांचं योग्य संवर्धन करण्याची गरज पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. 

खुंटवली गावाबाहेरील डोंगर वन विभागाच्या अखत्यारीत येतो तिथे अशा प्रकारे वन आणि जलसंवर्धन करता येणे शक्य आहे. त्यामुळे त्याबाबत योग्य ती पावलं उचलली जातील असं आश्वासन वनविभागानं दिलं आहे. पाणीटंचाईच्या काळात नैसर्गिक जलस्त्रोतचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास पाण्याची दाहकता नक्कीच कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे अशा प्रकारचे नैसगिक जलस्त्रोत जतन करणे ही काळाची गरज आहे.