स्वाती नाईक, पनवेल : महापालिका निवडणुकी साठी प्रचाराचा शेवटचा आठवडा उरल्यानं सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाआघाडीची प्रचासभा पनवेलमध्ये पार पडली.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी विदानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार शशिकांत शिंदे, शेकापचे नेते विवेक पाटील जयंत पाटील उपस्थित होते. पनवेल महापालिकेवर आघाडीचा महापौर होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
तर दुसरीकडे भाजपचे मंत्री गिरीश बापट , माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, युवा सेने अध्यक्ष आदित्य ठाकरे हे सर्वच नेते प्रचारासाठी पनवेलमध्ये दाखल झाले आहेत. पनवेल महापलिकच्या प्रचाराचा शेवटचा आठवडा असल्यानं सर्वच बड्या पक्षाचे नेते रणधुमाळीत उतरलेत. गुरुवारी दिवसभर सगळ्याच बड्या नेत्यांनी पनवेलमध्ये सभा घेऊन मतदारांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न केला.
राज्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गुरुवारी भाजपच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झाले. तिकडे शेकाप-काँग्रेस महाआघाडीच्या सभेला दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी कोकणातल्या संघर्ष यात्रेऐवजी पनवेलमध्ये प्रचाराला प्राधान्य दिलं. पण सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडायला चव्हाण विसरले नाहीत.
तिकडे शिवसेनेच्या प्रचारासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे पनवेलमध्ये होते. पनवेलकरांच्या हितासाठी झटणाऱ्या शिवसैनिकांना शहरवासियांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास आदित्य यांनी यावेळी व्यक्त केला. येत्या 24 तारखेला पनवेल मनपाच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीचे मतदान होणार आहे.