चार दिवस सासुचे, तसे चार दिवस सुनेचेही - अजित पवार

बरं झालं मतदारांनी देवेंद्र फडणवीसांना गाजर दाखवलं, अशा शब्दांत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या रद्द झालेल्या पुण्यातल्या सभेची खिल्ली उडवली. घोरपडीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

Updated: Feb 18, 2017, 11:09 PM IST
चार दिवस सासुचे, तसे चार दिवस सुनेचेही - अजित पवार title=

पुणे : बरं झालं मतदारांनी देवेंद्र फडणवीसांना गाजर दाखवलं, अशा शब्दांत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या रद्द झालेल्या पुण्यातल्या सभेची खिल्ली उडवली. घोरपडीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

'आज देवेन्द्र फडणवीसांच्या सभेला ५० लोकही नव्हते... मुख्यमंत्र्यांना न बोलताच जावं लागलं. भाजपच्या बालेकिल्ल्यात, पालकमंत्र्यांच्या मतदार संघात हे घडलं... यामुळे नेमकं चाललंय काय, हेही लोकांच्या लक्षात आलंय... विरोधकच नाही तर आरएसएसदेखील भाजपवर नाराज आहे... आज बरं झालं मतदारांनी देखील देवेंद्र फडणवीसांना गाजर दाखवलं' असं अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलं.

'व्यंकय्या नायडू हे काय नाव आहे?'

व्यंकय्या नायडू यांनी मुळा - मुठेचं नाव बदलण्याची भाषा केली. त्याला  प्रत्यूत्तर देताना 'नायडू म्हणाले मुळा -मुठेचं नाव बदला... आम्ही म्हणतो व्यंकय्या नायडू हे काय नाव आहे? तुम्ही तुमच्या खानदानाची नावं काय बदलायची ते बदला... आमच्या अस्मितेला हात लावू नका, आम्ही ते सहन करणार नाही' असं म्हणत पवारांनीही अस्मितेचा मुद्दा उचलून धरला.

'चार दिवस सुनेचेही...'

भाजपच्या राजकारणी धोरणावर टीका करताना 'आम्ही 15 वर्षात कुणाला अकारण त्रास दिला नाही. आज सरकारी यंत्रणेचा गैरवापर होतोय... काल माझी गाडी तपासली, माझी काहीच हरकत नाही. पण बाकीच्या पक्षांच्या नेत्यांच्याही गाड्या तपासल्या गेल्या पाहिजे... चार दिवस सासुचे, तसे चार दिवस सुनेचेही असतात, हे लक्षात ठेवा. मात्र आम्ही त्यांच्यासारखा डूख धरणार नाही' असं म्हणत अजित पवारांनी भाजपला इशाराही दिलाय.