रेल्वेची उद्घोषणा झाली आणि त्याच्या अपहरणाचे बिंग फुटले

 अपहरण कर्त्यांचा फोन काकांना आला. त्याचवेळी रेल्वेची उद्घोषणा झाली आणि त्याच्या अपहरणाचे बिंग फुटले.

Updated: Sep 7, 2016, 01:48 PM IST
रेल्वेची उद्घोषणा झाली आणि त्याच्या अपहरणाचे बिंग फुटले title=

चंद्रपूर : बल्लारपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. ४ सप्टेंबरच्या संध्याकाळी 5 वर्षांचा कृष्णा घराबाहेर खेळता खेळता अचानक गायब झाला. रात्री अडीच वाजता कृष्णाच्या कुटुंबीयांनी रडत रडत पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान, अपहरण कर्त्यांचा फोन काकांना आला. त्याचवेळी रेल्वेची उद्घोषणा झाली आणि त्याच्या अपहरणाचे बिंग फुटले.

बल्लारपूरमध्ये परिसरातल्या रवी नावाच्या तरुणाबरोबर कृष्णाला जाताना पाहिल्याची पहिली टीप पोलिसांना मिळाली. मग आरोपीच्या अख्ख्या कुटुंबाला पोलीस स्टेशनमध्ये आणले. आरोपीच्या काकाचा फोन खणखणला. कृष्णाला घेऊन पळालेल्या रवीचाच तो फोन होता. काका हळू आवाजात बोलतोय, त्यामुळे रवीला संशय आला आणि त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आपण चेन्नईला जात असल्याचे सांगितले. पण तेवढ्यात नरखेड रेल्वे स्टेशन पर आपक स्वागत है' अशी उद्घोषणा त्या फोनमधून ऐकायला  आली आणि तातडीने तपासाची चक्रे फिरली. 

कृष्णाचे फोटो RPFला व्हॉटसअप करण्यात आले आणि अख्खा फोर्स कामाला लागला. मध्यप्रदेशातल्या  'आमला' रेल्वे स्टेशनवर आरोपी रवी केशकर  RPF च्या जाळ्यात अडकला. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी यंत्रणांवर कमालीचा ताण होता, तरीही यंत्रणेनं मनावर घेतलं तर काय होऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण यानिमित्तानं समोर आले. छोटा कृष्णा त्याच्या यशोदेला परत मिळाला. आणि बल्लारपूरमधल्या त्याच्या छोट्याशा घरात आनंदी आनंद झाला. आता हा चिमुकला सध्या त्याच्या आईच्या कडेवर सुरक्षित आहे. पण हा सुखाचा क्षण येण्याआधी बरीच उलथापालथ झाली.