नवी मुंबई: दहीहंडीचा उत्सव काही दिवसांवर आला असतांनाच एका छोट्या गोविंदाचा जीव गेलाय. गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न तसा ऐरणीवर आहे. शिवाय आता 12 वर्षांखालील गोविंदांना बंदी ही घातली गेलीय. मात्र सानपाडा इथं सरावादरम्यान पाचव्या थरावरून कोसळून एका गोविंदाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
सानपाडा परिसरात काल रात्री हा गोविंदा पडला. आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. किरण तळेकर असं या गोविंदाचं नाव असून तो १४ वर्षांचा होता. काल रात्री सानपाडा परिसरात दहीहंडीचा सराव सुरू होता. त्यावेळी अचानक थर सरकले आणि पाचव्या थरावरून किरण खाली कोसळला.
त्याच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली. त्याला तातडीनं नेरूळ इथल्या तेरणा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तिथं अपुऱ्या सुविधेमुळं त्याला दाखल करून घेण्यात आलं नाही. तिथून त्याला वाशीच्या महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज सकाळपर्यंत त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले. पण अखेर आज सकाळी त्यानं उपचारांना प्रतिसाद देणं थांबविले आणि त्याचा मृत्यू झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.