ठाणे: राज्यातल्या बारा टोलनाक्यांना आजपासून कायमचं टाळं लागलंय. तर ५३ टोलनाक्यांवर लहान खाजगी वाहनं, एस.टी. आणि स्कूल बसला टोलमाफी मिळणार आहे.
सत्तेवर येण्यापूर्वी भाजपनं संपूर्ण टोलमाफीची घोषणा केली होती. त्या दिशेनं पहिलं पाऊल टाकत सरकारनं राज्यातल्या ६५ टोलनाक्यांपासून जनतेला दिलासा दिलाय. या संदर्भातली अधिसूचना शुक्रवारी काढण्यात आली होती.
६५ टोलनाक्यांपासून मुक्ती मिळत असतानाच चर्चेत असलेला कोल्हापूर आणि मुंबईतल्या पाच एन्ट्री पॉईंटच्या टोलमाफीबाबत सरकारनं एक इंचही प्रगती केलेली नाही. कोल्हापूर टोलनाक्याबाबत ३१ मेपर्यंत सकारात्मक निर्णय घेण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली होती.
मात्र कोल्हापूर टोलनाक्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अद्याप अहवाल आलेला नाही. दुसरीकडे मुंबई एन्ट्री पॉईंट टोलबाबत निर्णय घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीचाही अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळं आता ६५ टोलनाक्यांवर टोलमुक्ती मिळाली असताना कोल्हापूर आणि मुंबई एन्ट्री पाईंटच्या टोलसंदर्भात निर्णयाची जनतेला प्रतीक्षा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.