अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : नागपूरच्या 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचा IQ अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकींग्ज यांच्या इतका असल्याचं सिद्ध झालंय. अखिलेश चांदोरकर असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. सातवीच्या विद्यार्थ्यांने ही परीक्षा 18 तारखेला दिली होती. जगातल्या एवढा आयक्यू असलेल्या केवळ 2 टक्के व्यक्तींच्या यादीत त्याचं नाव समाविष्ट झालंय.
अवघ्या 11 वर्षांच्या अखिलेशने जग जिंकलंय. अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकींग्ज यांच्या इतका आयक्यू म्हणजे बुद्ध्यांक मिळवणारा अखिलेश एकमेव आहे. मागच्या महिन्यात मेन्स ग्लोबल सोसाय़टीतर्फे घेण्य़ात आलेल्या परीक्षेत त्याने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं.
या परीक्षेत त्याला 160 गुण मिळालेत. याचा अर्थ अखिलेशचा मेंदू अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकींग्ज इतका तल्लख आहे. ऑक्सफर्डमध्ये 1946 साली स्थापन झालेल्या आणि अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या मेन्स ग्लोबल सोसायटीचं त्याला सदस्यत्व मिळणार आहे. असाधारण आयक्यू असलेल्यांना या सोसायटीचं सदस्यत्व मिळतं.
अखिलेशचं वेगळेपण त्याच्या पालकांना त्याच्या लहानपणीच समजलं होतं. पहिल्या वर्गात असताना तो तिस-या वर्गाचा अभ्यास सहज करायचा. अनेक कठीण शब्दांचे अर्थ तो अगदी सहज सांगत असे. कठीण कोडी सोडवायचा. अखिलेशचं सुरूवातीचं शिक्षण स्कॉटलंडमध्ये झाल्याने तिथल्या त्याच्या शिक्षकांनाही अखिलेशच्या या बुद्धीमत्तेचं कौतुक वाटत असे. आईनस्टाईन, स्टीफन हॉकींग्ज यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी अखिलेशचे आदर्श आहेत. त्याला खगोल शास्त्रात अभ्यास करायचा आहे.
पुस्तकं वाचण्यासोबतच टेनिस खेळण्याची त्याला आवड आहे. सध्या ब्लॅक होल या विषयावर काम करणा-या अखिलेशने यापुढे त्याच्या आवडीच्या खगोल शास्त्र विषयात करियर करावं अशी त्याच्या पालकांचीही इच्छा आहे. नागपूरच्या या यंग इनोव्हेटरला झी 24 तासच्या शुभेच्छा