ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - सावंतवाडी

खरंतर सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे आणि नारायण राणे म्हणजे सिंधुदुर्ग असं समीकरण गेल्या काही वर्षात बनलं आहे. पण सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी राणेंविरोधात दंड थोपटले आहेत. राणेंना विरोध करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय. त्यामुळे सावंतवाडीतील राजकारणाला वेगळं वळणं मिळालंय.

Updated: Oct 8, 2014, 01:58 PM IST
 title=

सिंधुदुर्ग : खरंतर सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे आणि नारायण राणे म्हणजे सिंधुदुर्ग असं समीकरण गेल्या काही वर्षात बनलं आहे. पण सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी राणेंविरोधात दंड थोपटले आहेत. राणेंना विरोध करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय. त्यामुळे सावंतवाडीतील राजकारणाला वेगळं वळणं मिळालंय.

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - मुक्ताईनगर
शिवसेना - दीपक केसरकर
भाजप - राजन तेली
काँग्रेस - चंद्रकांत गावडे
राष्ट्रवादी - सुरेश दळवी
मनसे - परशुराम उपरकर 

गोव्याच्या हद्दीला भिडलेला, मोती तलावाच्या काठावर वसलेला आणि तिलारीच्या पाण्यानं भिजलेला असा हा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ.

सावंतवाडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात वेंगुर्ला, सावंतवाडी, आणि दोडामार्ग या तिन तालुक्यांचा समावेश होतो. राणेंच्या वादळातही राष्ट्रवादीने राखलेला मतदारसंघ अशी या मतदारसंघाची कालपर्यंत ओळख होती. 

२००९ च्या निवडणुकीचा विचार करता  या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दीपक केसरकर यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली होती. या निवडणूकीत दीपक केसरकर यांना ६३ हजार ४३० मते मिळाली होती. 

तर शिवसेनेकडून लढलेल्या शिवराम दळवी यांना ४५ हजार १२ मते मिळाली होती. दीपक केसरकर यांनी या निवडणूकीत १८ हजार ४१८ चे मताधिक्य मिळवलं होतं.

पाच वर्षानंतर सावंतवाडीचे राजकारण ३६० अंशात फिरलं आहे. त्याला कारणीभूत ठरली  लोकसभेची निवडणूक.

काँग्रेसचे उमेदवार निलेश राणेंच्या विरोधात केसरकर यांनी भूमिका घेतली आणि परिणामी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून डच्चू दिला.

राष्ट्रवादीचे केसरकर यांनी आता शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय तर शिवसेनेचे शिवराम दळवी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.

नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता शिवसेनेचे विनायक राऊत यांना या मतदारसंघातून ८८ हजार ९८६ तर काँग्रेसचे डॉ. निलेश राणे यांना ४७ हजार ३५१ ही मतं मिळाली.

पण गेल्या विधानसभा  निवडणूकीचा विचार करता नारायण राणे यांच्या मदतीमुळेच केसरकरांना इथ विजय मिळवता आल्याचा दावा काँग्रेसकडून केला जातोय. मात्र असं असलं तरी गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील विकासकामांना राणेंनीच विरोध केल्याचा आरोप विद्यमान आमदार करतायत.

आमदार केसरकर यांच्या म्हणण्यानुसार
- तीनही तालुक्यांना विकासनिधी दिला
- पर्यटनाला चालना दिली
- सावंतवाडी शहर सुंदर बनवले

विरोधक मात्र केसरकरांवर आरोपांच्या फैरी झाडतायत. केसरकर-राणे वादात मतदारसंघाचा विकास खुंटल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या मतदारसंघातून राणेंपासून दुरावलेले राजन तेली आणि मनसेचे परशुराम उपरकर या दोघांनीही केसरकरांनाच लक्ष्य केलंय.

या मतदारसंघातील समस्यांचा विचार करता ग्रामीण भागात आजही रस्त्यांचा प्रश्न कायम आहे तसेच मायनिंगचा, प्रकल्पग्रस्त,तिलारी या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायम आहेत. मच्छीमारांचा  प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.तसेच अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. दीपक केसरकर यांच्यावर विरोधक आरोप करत असले तरी त्यांच्या  विरोधात कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हा प्रश्न कायम असून  विरोधकांमधील या संभ्रमाचा केसरकरांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आगामी विधानसभा निवडणूकत एक वेगळचं चित्र पहायला मिळणार आहे. सावंतवाडीच्या निवडणूक लढाईत नारायण राणे थेट उतरणार नसले तरी सारेच राणे विरोधक एकमेंकाशी लढतांना दिसणार आहेत. 

दीपक केसरकर, राजन तेली, परशूराम उपरकर हे एकेकाळचे राणेंचे कट्टर समर्थक मात्र आता ते राणेंपासून दुरावले असून हे एकमेकांविरोधात लढणार आहेत. या पार्श्ववभूमीवर आता नारायण राणे कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकतायत त्यावरच सावंतवाडीचा पुढचा आमदार ठरणार आहे. पण ही निवडणूक प्रत्येकाची अस्तित्वाची लढाई ठरणार हे मात्र नक्की.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.