लातूर : भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं वर्चस्व राहिलेल्या या मतदारसंघावर गेल्यावेळी काँग्रेसने कब्जा मिळवला. विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक वैजनाथ शिंदे हे इथले विद्यमान आमदार आहेत. 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या रेणापूर मतदारसंघाचं रुपांतर लातूर ग्रामीण या मतदारसंघात झालं आणि तिथेच भाजपचा हा बालेकिल्ला काँग्रेसच्या ताब्यात गेला.
विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -
शिवसेना - हरिभाऊ साप्ते
भाजप - रमेश कराड
काँग्रेस - त्र्यंबक भिसे
राष्ट्रवादी - आशाताई भिसे
मनसे - संतोष नागरगोजे
लातूर, रेणापूर आणि औसा या तीन तालुक्यांचा मिळून लातूर ग्रामीण हा मतदारसंघ तयार झालाय. यात लातूर तालुक्यातील 82 गावे, रेणापूरमधील 78 तर औसा तालुक्यातील 26 गावांचा समावेश आहे.
गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या वैजनात शिंदे यांनी भाजपच्या रमेशअप्पा कराड यांचा 23 हजार 583 मतांनी पराभव करत काँग्रेसचा झेंडा फडकावला. या मतदारसंघात पाच वर्षात...
- मांजरा नदीवर बॅरेज
- 15 हजार हेक्टर जमिन सिंचनाखाली
- प्रत्येक बंधाऱ्यावर 33 के.व्ही. चे उपकेंद्र
- रस्ते दुरूस्ती
- केंद्राची पेयजल योजना
- 1100 हून अधिक नवीन ट्रान्सफार्मर
- अशी सुमारे 1250 कोटींची विकासकामे केल्याचा दावा विद्यमान आमदार वैजनाथ शिंदे यांनी केलाय.
भाजपचे रमेशअप्पा कराड यांनी मात्र शिंदे यांचे हे सर्व दावे खोडून काढलेत. काँग्रेस-भाजपच्या या कुरघोडीच्या राजकारणात लातूरकरांच्या समस्या मात्र सुटलेल्या नाहीत.
- पिण्यासाठी दूषित पाणीपुरवठा
- नागरिकांचे आरोग्य धोक्यात
- शहरात घाणीचं साम्राज्य
- दिग्गज नेते असूनही विकास नाही
- एस.टी.च्या लांब पल्ल्याच्या गाड्या नाहीत
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून भाजपच्या डॉ. सुनिल गायकवाड यांना सुमारे 27 हजार मतांची आघाडी मिळालीये. त्यामुळे काँग्रेससाठी मोदी लाट पुन्हा डोकेदुखी ठरणार का, हा कळीचा मुद्दा आहे.
विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे या दोन्ही नेत्यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात अजूनही आहे. त्यामुळे हा मतदार आगामी निवडणुकीत कुणाला यश मिळवून देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.