ऑडिट विधानसभा मतदारसंघ - धुळे ग्रामीण

धुळे ग्रामीण मतदारसंघ. एकेकाळी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून लक्ष वेधणारे रोहिदास पाटील यांना याच मतदारसंघात गेल्यावेळी पराभूत व्हावं लागलं. शिवसेनेच्या शरद पाटील यांनी त्यांचा पराभव केला. 

Updated: Oct 1, 2014, 04:00 PM IST
ऑडिट विधानसभा मतदारसंघ - धुळे ग्रामीण title=

धुळे : धुळे ग्रामीण मतदारसंघ. एकेकाळी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून लक्ष वेधणारे रोहिदास पाटील यांना याच मतदारसंघात गेल्यावेळी पराभूत व्हावं लागलं. शिवसेनेच्या शरद पाटील यांनी त्यांचा पराभव केला. 

धुळे ग्रामीण मतदारसंघ हा खानदेशातला सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुका, अशी ओळख म्हणजे या मतदारसंघातील जनतेचं दुर्दैवच म्हणावं लागेल. राजकारणाचे अनेक रंग इथली जनता वर्षानुवर्ष पाहत आहे.  दरवर्षी या मतदार संघात शेतकरी आत्महत्या हा चर्चेचा विषय राहिलाय. सिंचनप्रकल्पांअभावी दुष्काळाच्या फे-यात इथली जनता अडकली आहे. याचच उदाहरण म्हणून गेली 30 वर्ष अक्कलपाडा प्रकल्प हा राजकीय मुद्दा घेऊन राजकारणी राजकारण करताहेत. काँग्रेसच्या रोहिदास पाटील यांनी याच धरणाचा मुद्दा हाती घेऊन आजपर्यंत निवडणुका लढल्या आणि जिंकल्या. मात्र धरणप्रकल्प पूर्ण करण्यात ते यशस्वी ठरले नाहीत. 

2009 च्या विधानसभा निवडणुकीत हाच मुद्दा हाती घेऊन शिवसेनेच्या शरद पाटील यांनी रोहिदास पाटील यांचा पराभव केला. अटीतटीच्या या निवडणुकीत रोहिदास पाटलांसमोर नवखे असलेल्या शरद पाटील यांनी 18982 मताधिक्याने पराभव केला. धुळ्याच्या जनतेने शरद पाटील यांच्या झोळीत भरभरून 1 लाख 562 मते टाकली. तर काँग्रेसच्या अनुभवी रोहिदास पाटील यांना 81 हजार 580 मतांवर समाधान मानावं लागलं. 

आमदारांची विकासकामे...

पाच वर्षांत अक्कलपाडा धरण प्रकल्पाबरोबरच मतदारसंघात अनेक विकासकामे केल्याचं शरद पाटील सांगतात. यामध्ये अक्कलपाडा धरण प्रकल्पासाठी 280 कोटींचा निधी, १२ सब स्टेशनची उभारणी, ३४०० सिंचन विहिरींना मंजुरी, ग्रामीण भागात रस्ते दुरुस्ती, सात हजार घरकुलांना आदी कामांची समावेश आहे. या मतदारसंघात सुमारे ५०० कोटींहून अधिक निधीची विकासकामे केल्याचा दावा शरद पाटील यांनी केलाय.  

धुळ्यातील समस्या...

विद्यमान आमदार शरद पाटील विकासकामांचा दावा करत असले तरी धुळ्याची ग्रामीण जनता अनेक समस्यांच्या विळख्यात अडकली असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. गावागावात संघर्ष घडवण्याचा राजकारण्यांचा डाव, युवकांच्या हातांना काम नाही, मोठे उद्योग नाहीत, रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. अशा अनेक समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. राजकारणी फक्त राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

धुळ्यातली जनता या आजी माजी आमदारांना कंटाळली असल्याची टीका केली जात आहे. त्यामुळे या दोघांनाही धडा शिकवण्यासाठी विरोधकही सज्ज झालेत. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि काँग्रेसला पक्षांतर्गत राजकारणाचा फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करताहेत.  तर दुसरीकडे विकासकामांचा मुद्दा हाच यंदाच्या निवडणुकीत प्रभावी ठरेल असंही मत व्यक्त केलं जातंय. 

अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये असलेले आणि राजकारणात मुरब्बी, अनुभवी अशा रोहिदास पाटील यांना टशन देत शरद पाटील यांनी मतदारसंघावर आपला प्रभाव तर पाडलाय. आता हा प्रभाव टिकवून ठेवण्याचं खरं आव्हान त्यांच्यापुढे आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.