प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा

काँग्रेसला विधानसभेत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी विधीमंडळ पक्षनेते पदासाठी आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू झाली आहे. 

Updated: Oct 25, 2014, 03:23 PM IST
प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा  title=

मुंबई : काँग्रेसला विधानसभेत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी विधीमंडळ पक्षनेते पदासाठी आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू झाली आहे. 

प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नारायण राणे यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. सत्ता असो वा नसो पदावरून प्रत्येक पक्षात संघर्ष हा असतोच याचेच हे द्योतक आहे. विधिमंडळ पक्षनेतेपदी निवडीसाठी आणि प्रदेशाध्यक्षपदासाठीही काँग्रेस पक्षात तीव्र चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिला तर विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी काँग्रेसमध्ये विशेष चुरस आहे. 

राज्यात 15 वर्षे सत्तेत असूनही काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत अवघ्या 42 जागा मिळवत्या आल्या. काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत अपयश आलं असलं तरी पदावरून काँग्रेसमध्ये नेहमी होणारी स्पर्धा आणि चुरस यावेळीही दिसून येत आहे. 

काँग्रेसमध्ये आता स्पर्धा सुरू झालीय ती विधिमंडळ पक्ष नेते पदासाठी. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव या पदासाठी सगळ्यात पुढे आहे. मात्र त्यांच्या नावाला काँग्रेसमध्ये तीव्र विरोध होतोय.
 
पृथ्वीराजबाबांबद्दल काँग्रेसमध्ये पूर्वीपासून नाराजी होतीच, या नाराजीत भर पडली ती मतदानाच्या दिवशी त्यांनी एका मुलाखतीत आदर्शबाबत केलेल्या विधानामुळे.. सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख या काँग्रेसच्याच तीन माजी मुख्यमंत्र्यांना त्यांनी या विधानाने आरोपीच्या पिंजऱ्यात नेऊन उभं केलं होतं. 

त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी तर थेट सोनिया गांधींना फोन करून चव्हाणांविरोधात तक्रार केली आहे. अशा स्थितीत चव्हाणांना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करायला तीव्र विरोध होऊ शकतो. दुसरीकडे या पदासाठी पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही जोरदार फिल्डींग लावली आहे. 

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेटही घेतल्याचे समजते. पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीतून पाठिंबा मिळाला नाही तर विधिमंडळ पक्ष नेतेपदावर त्यांच्या ऐवजी स्पर्धेतील इतर कुठल्याही एका नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.