सांगली: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील महत्वाचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून, आजपर्यंत प्रत्येक मंत्रिमंडळात सांगलीचं प्रतिनिधित्व होतं. राज्यात भाजपचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण दहा मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र सांगलीचा मंत्री नसणारा हा पहिलाच शपथविधी ठरलाय.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र इथला. याच जिल्हातले वसंतदादा पाटील यांनी तब्बल चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलं. ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील यांनी महसुल, उद्योग, अर्थ, उर्जा, ग्रामविकास अशा सारख्या अनेक खात्यांचा कार्यभाग सांभाळला. यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील, वसंतदादा पाटील, शिवाजीराव देशमुख, शालिनीताई पाटील, पतंगराव कदम आणि शिवाजीराव शेंडगे असे अनेक मंत्री काँग्रेसच्या मंत्रीमंडळात होते.
१९७८ साली पुलोदच्या सरकारमध्ये राजारामबापू पाटील आणि प्रा. एन. डी. पाटील हे मंत्री होते. राज्यात १९९५ सालच्या शिवसेना भाजपा युती सरकारमध्ये भाजपचे अण्णा डांगे, अपक्ष शिवाजीराव नाईक आणि अपक्ष अजित घोरपडे हे मंत्री होते.
त्यानंतर १९९९ साली सत्तेवर आलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये काँग्रेसकडून पतंगराव कदम, तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, आर. आर. पाटील हे सलग पंधरा वर्ष मंत्री होते. आघाडी सरकारमध्ये अजित घोरपडे हे २००३ साली काँग्रेसकडून मंत्री झाले होते. तर २००४ साली अपक्ष म्हणून निवडून आलेले मदन पाटील हे काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री झाले होते.
सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी सांगली जिल्ह्यातील मंत्री असणारच हे सूत्र ठरलेलं असायचं. नव्या मंत्री मंडळात सांगलीचा मंत्री असणार हे निश्चित मानलं जात होतं. मात्र वानखेडेवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात सांगलीच्या कोणालाच संधी मिळाली नाही. आमदार शिवाजीराव नाईक आणि सुरेश खाडे हे मंत्री पदाचे दावेदार मानलं जात असल्यानं, मंत्रीमंडळ विस्तारात तरी सांगलीला मंत्री पद मिळावं अशी मागणी होतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.