मुंबई: निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांचं घमासान सुरू झालंय. पृथ्वीराज काँग्रेसमध्ये 'हिटलिस्ट'वर असतानाच मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी केलेलं विधान त्यांच्या पक्षातील विरोधकांसाठी आयतंच कोलीत देणारं ठरलंय.
आदर्श घोटाळ्याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य अयोग्य असल्याचं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केलंय. विधानसभा निवडणुकीत आवश्यक ती प्रचार यंत्रणा पुरविण्यात मुख्यमंत्री कमी पडले, या शब्दात माणिकराव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांबाबत आपली नाराजी व्यक्त केलीय.
तसंच आम्ही आमच्या विचाराशी जवळीक असलेल्या पक्षासोबतच राहणार, इतर कोणासोबत जाणार नाही, असंही माणिकराव म्हणाले.
'आदर्श प्रकरणात कारवाई केली असती तर पक्षात फूट पडली असती', असं विधान पृथ्वीराज यांनी 'द टेलिग्राफ' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. मतदानाच्या तोंडावर करण्यात आलेल्या या विधानानं पक्षाची प्रतिमा मलिन झाली. शिवाय पक्षशिस्त मोडण्याचंही काम पृथ्वीराज यांनी केलं आहे. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पृथ्वीराज विरोधकांनी लावून धरली असल्याचं कळतंय.
एकूणच काय तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट झाल्यास पृथ्वीराज चव्हाण यांना मोठ्या 'शिक्षे'ला सामोरं जावं लागू शकतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.