अडवाणींनी युतीवरून भाजप नेत्यांना सुनावलं

शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही खेद व्यक्त केलाय. भाजप नेत्यांनी आपली जबाबदारी ओळखून, राज्याराज्यातल्या प्रादेशिक पक्षांना झुकतं माप देण्याची गरज आहे, असा वडीलकीचा सल्ला अडवाणी यांनी दिलाय.

Updated: Oct 2, 2014, 06:53 PM IST
अडवाणींनी युतीवरून भाजप नेत्यांना सुनावलं  title=

अहमदाबाद: शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही खेद व्यक्त केलाय. भाजप नेत्यांनी आपली जबाबदारी ओळखून, राज्याराज्यातल्या प्रादेशिक पक्षांना झुकतं माप देण्याची गरज आहे, असा वडीलकीचा सल्ला अडवाणी यांनी दिलाय.

युती तुटली नसती, तर मला आनंद झाला असता, असं अडवाणी म्हणाले. याशिवाय त्यांनी भाजपला आपल्या जबाबदारीची जाणीवही करून दिली आहे.

आमच्या पक्षातील अनेक नेते जागावाटपावरुन नाराज होते. भाजपला जास्त जागा द्यायला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. याविषयी मला जास्त काही माहिती नाही. मात्र एनडीएतील मित्रपक्ष हे राज्यपातळीवरील पक्ष असल्यानं, राज्यात तेच शक्तीशाली आहेत, असं अडवाणींनी नमूद केलं.

मोदींचं कौतुक करत असतानाच अडवाणी अचानक वाजपेयींच्या आठवणींनी भावूक झाले. ते म्हणाले, 'स्वतंत्र भारताच्या इतिहासात वाजपेयींसारखा दुसरा पंतप्रधान मला दिसत नाही. त्यांना देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या आदराची कल्पनाही कोणी करू शकत नाही,' असं अडवाणी म्हणाले.

स्वच्छता अभियानानिमित्त अडवाणी गुरुवारी अहमदाबादमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.