मुंबई : महाराष्ट्रात सत्तेचं गणित भाजप कसं जुळवणार, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यातच शरद पवारांनी एकापाठोपाठ एक 'स्फोट' करण्याचा धडाकाच लावलाय. काय सुरूय, महाराष्ट्राच्या राजकारणात? पाहूयात हा खास रिपोर्ट...
महाराष्ट्रात पहिल्यांदाच भाजप सरकार येणार, हे स्पष्ट आहे. पण ते कसं येणार? याचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एकीकडं भाजपचा विधिमंडळ पक्षनेता अर्थातच मुख्यमंत्री निवडण्यासाठीची बैठक पुढं गेलीय. केंद्रीय निरीक्षक राजनाथ सिंह आणि जे. पी. नड्डा आता मंगळवारी भाजप आमदारांशी चर्चा करणार आहेत. मात्र सरकार स्थापनेसाठी कुणाचा पाठिंबा घ्यायचा, याबाबत भाजपचा निर्णय अद्याप झालेला नाही. भाजपनं शिवसेनेसोबत जावं, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी घेतली आहे.
मात्र शिवसेनेनं अजूनही पाठिंब्याबाबतचा निर्णय गुलदस्त्यातच ठेवलाय. शिवसेना आमदारांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत युती करण्याचे तसंच विधिमंडळ नेता निवडीचे अधिकार उद्धव ठाकरेंना देण्यात आले.
तर दुसरीकडं भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हारतुरे घेऊन उभी आहे. भाजप सरकारला पाठिंबा देण्यामागं शरद पवारांचा नेमका काय हेतू असावा? शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी पवारांची ही खेळी होती? विविध घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या राष्ट्रवादी नेत्यांना 'सेफ पॅसेज' मिळावा, यासाठीचा हा खटाटोप होता? वेळप्रसंगी भाजपमधील राष्ट्रवादीच्या बंडखोरांना फोडण्याची ताकद आपल्यात आहे, असा इशारा देण्याचा पवारांचा प्रयत्न तर नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. स्वतःला सेक्युलर म्हणवणारी राष्ट्रवादी आता भाजपला पाठिंबा कशी देते? असा खोचक टोला काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला आहे.
स्थिर सरकार देण्यासाठीच राष्ट्रवादीनं पाठिंबा देण्याची भूमिका घेतली, असा खुलासा राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नवनिर्वाचित नेते अजित पवार यांनी केलाय.
दरम्यान, शरद पवारांनी सोमवारी आणखी एक गौप्यस्फोट करून काँग्रेसला तोंडघशी पाडलं. शिवसेनेच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव काँग्रेसनं दिला होता, असा भांडाफोड पवारांनी केला.
महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीची पीछेहाट झाली. पण अजूनही शरद पवार नावाचं अनप्रेडिक्टेबल रसायन आपला करिश्मा टिकवून आहे. पवारांच्या या पॉवर गेममुळं महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणं निर्माण होणार का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांचं भाजप नेतृत्व पवारांच्या या गेम प्लानला काय उत्तर देणार? आणि स्थिर सरकार देण्यासाठी बहुमताची जुळवाजुळव कशी करणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.