नवी दिल्ली: मोहालीमध्ये झालेल्या टी 20 आधी युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर टीका केली होती. आधी क्रिकेटर असलेले योगराज सिंग आता अभिनय क्षेत्रामध्ये आपली दुसरी इनिंग खेळत आहेत. मला ऑस्कर जिंकायचं आहे, अशी इच्छा योगराज सिंग यांनी व्यक्त केली आहे.
भाग मिल्खा भाग या चित्रपटामध्ये त्यांनी फरहान अख्तरच्या कोचची भूमिका केली आहे.
मिड-डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगराज सिंग यांनी दावा केला आहे की सध्या त्यांच्याकडे 42 चित्रपट आहेत. भाग मिल्खा भागनं माझं आयुष्यच बदलून गेलं. मी एवढं काम करीन याचा कधीच विचार केला नव्हता, सध्या मी 14 ते 15 तास काम करत असल्याची प्रतिक्रिया योगराज सिंग यांनी दिली आहे.
मी आणि युवराज एकाच जहाजामध्ये आहोत. माझं कुटुंब विरोधात असतानाही मी स्वत:ला सिद्ध केलं. मला आणि युवराजला एकमेकांकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे, असं योगराज सिंग म्हणाले आहेत.