अमरापूरकरांची एक्झिट: बॉलिवूडचा इतिहास अमरापूरकांशिवाय अपूर्णच

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारं मराठमोळं अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे सदाशिव अमरापूरकर यांचं दु:खद निधन झालंय. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६५ वर्षांचे होते.

Updated: Nov 3, 2014, 07:34 AM IST
अमरापूरकरांची एक्झिट: बॉलिवूडचा इतिहास अमरापूरकांशिवाय अपूर्णच title=

मुंबई: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारं मराठमोळं अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे सदाशिव अमरापूरकर यांचं दु:खद निधन झालंय. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६५ वर्षांचे होते.

सडक सिनेमातील महाराणीचं कॅरेक्टर सदाशिव अमरापूरकर यांच्या बॉलिवूडच्या काही अत्यंत गाजलेल्या कॅरेक्टरपैकी हे एक कॅरेक्टर... बॉलिवूडचा इतिहास या कॅरेक्टरशिवाय पूर्णच होवू शकत नाही. ९० च्या दशकात रुपेरी पडद्यावरचं हे कॅरेक्टर अत्यंत गाजलं होतं.

बॉलिवूडच्या पारंपरिक खलनायकाच्या प्रतिमेला छेद देत सदाशीव अमरापूरकर यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारचा वेगळा व्हिलन साकारला होता. सदाशिव अमरापूरकर यांच्या फिल्मी करिअरमधली त्यांनी साकारलेली ही महाराणीची भूमिका माईलस्टोन ठरली. खरं तर अमरापूरकर यांनी ही भूमिका करण्याआधी बॉलिवूडमध्ये बऱ्याच भूमिका केल्या होत्या. मात्र महाराणीच्या भूमिकेमुळे सर्वांनाच त्यांची दखल घ्यावी लागली.

गणेश कुमार नरवोडे अर्थात सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म ११ मे १९५० साली अहमदनगर जिल्हात झाला. १९७४ साली त्यांनी रंगभूमीवरुन आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरु केली. नाटकातून कामाला सुरुवात केल्यावर त्यांनी सदाशिव हे नाव धारण केलं.

१९७६ मध्ये आमरस या मराठी सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पहिलं पाउल टाकलं. १९७९ साली बाळ गंगाधर टिळक या सिनेमाच्या माध्यमातून त्यांना मोठा ब्रेक मिळाला. 

१९८१-८२च्या दरम्यान सदाशिव अमरापूरकर यांनी हँड्स-अप या नाटकात भूमिका केली. हे नाटक त्याकाळी हिट ठरलं. या नाटकातील सदाशिव अमरापूरकर यांची भूमिका दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी बघितली आणि त्यांनी अर्धसत्यसाठी अमरापूरकर यांनी कास्ट केलं. ‘अर्धसत्य’मधील सदाशिव अमरापूरकर यांच्या अभिनयाचं कौतूक झालं. पुढे त्यांनी अनेक हिंदी सिनेमात छोटे मोठे रोल केले. मात्र ८०च्या दशकाअखेर आलेल्या ‘हुकुमत’ सिनेमात सदाशिव अमरापूर यांनी साकारलेला व्हिलन हिट ठरला. आणि हिंदी सिनेमाच्या मुख्य प्रवाहात त्यांनी प्रवेश केला. पुढे धर्मेंद्र आणि सदाशिव अमरापूरकर या जोडीनं एकत्र अनेक चित्रपट दिले. 

९०च्या दशकात सदाशिव अमरापूरकर यांनी बॉलिवूडवर गारुड घातलं. त्यांनी या काळत अनेक सिनेमात व्हिलन साकारला. १९८४ साली ‘अर्धसत्य’ सिनेमातील भूमिकासाठी त्यांना फिल्मफेअरचा बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा पुरस्कार मिळाला. तर १९९१मध्ये सडकमधील महाराणीच्या भूमिकेसाठी फिल्मफेअरचा बेस्ट व्हिलन पुरस्कार त्यांना देण्यात आला.

१९८८ मध्ये कालचक्र आणि १९९८ मध्ये इश्कमधील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचं नॉमिनेशन मिळालं होतं..सदाशिव अमरापूरकर यांनी साकारलेला व्हिलन जसा प्रेक्षकांच्या लक्षात राहिला तसेच त्यांच्या कॉमेडी अंदाजही  प्रेक्षक भावला. आँखे मधील विसराभोळ्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत गाजली. कुली नंबर - १ मधील शादीराम घरजोडे ही भूमिकाही सिनेरसिक विसरु शकणार नाहीत..सदाशिव अमरापूरकर यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये विविध भूमिका केल्या आणि त्यांनी प्रत्येक भूमिका अक्षरश: जीवंत केली.

८० ते ९०च्या दशकातील सिनेमामध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. ‘आखें’, ‘इश्क’, ‘गुप्त’मध्ये त्यांनी विनोदी भूमिकांना न्याय दिला.
 
अभिनेत्यापलीकडे एक सुजाण नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून अमरापूर दिसले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी त्यांची बाजू सदाशिव अमरापूर यांनी मांडली.
 
मागील वर्षी धुलीवंदनादरम्यान समोरच्या इमारतीत मोठ्या आवाजात डीजे लावून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांची त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. मात्र त्यामुळे जमावाने घरात शिरुन त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली होती.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.