मुंबई: अमर हिंद मंडळ,दादर आयोजित ६९ व्या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन रविवार दि. १७ एप्रिल २०१६ रोजी, “रंग-तरंग” या कार्यक्रमाने होणार आहे. या कार्यक्रमात माजी अप्पर मुख्य सचिव व राज्य निवडणूक आयुक्त (महाराष्ट्र राज्य) श्रीमती नीला सत्यनारायण यांच्या बहु आयामी जीवनावर आधारित अशी ही मुलाखत अॅड. नीलिमा कानेटकर या घेणार आहेत.
रविवार दि. १७ एप्रिल ते रविवार दि. २४ एप्रिल २०१६ या कालावधीत संपन्न होणाऱ्या या व्याख्यानमालेत सोमवार दि. १८ एप्रिल रोजी डॉ. गिरीश दाबके यांचे “आर्य चाणक्य”, मंगळवार दि. १९ रोजी डॉ. अभिजित फडणीस याचं “जागतिक अर्थव्यवस्था आणि भारत”, तर बुधवार दि. २० एप्रिल रोजी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. बाळ फोंडके यांचे “गुरुत्वीय लहरी” या विषयांवर व्याख्यान होणार आहे.
गुरुवार दि. २१ एप्रिल २०१६ रोजी नाटककार श्री.सुरेश खरे यांची मधुवंती सप्रे या मुलाखत घेणार आहेत तर शुक्रवार दि. २२ एप्रिल २०१६ रोजी प्रसिद्ध गिर्यारोहक श्री. वसंत वसंत लिमये यांचे “गिर्यारोहण आणि गिरीभ्रमण – काल आणि आज” यावर आपली मते मांडणार आहेत.
तर शनिवार दि. २३ एप्रिल २०१६ रोजी झी 24 तास चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे “शोध नव्या भारताचा” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर रविवार दि. २४ एप्रिल २०१६ रोजी प्रसिद्ध साहित्यिक श्री. श्रीपाल सबनीस यांच्या “साहित्यातील बहुसांस्कृतिकता” या व्याख्यानाने व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे.
व्याख्यानमाला दररोज संध्याकाळी ठीक ७.१५ मंडळाच्या प्रांगणात संपन्न होणार असून सदर व्याख्यानमाला विनामूल्य आहे व सर्व रसिक श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे मंडळाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.