मुंबई : अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा आगामी सिनेमा 'तमाशा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण, त्याआधीच या सिनेमाची स्टोरी फुटलीय... महत्त्वाचं म्हणजे ही स्टोरी लीक करणारे दुसरं तिसरं कुणी नसून या सिनेमाचे मुख्य कलाकारच आहेत.
खुद्द रणवीर आणि दीपिकानंच या सिनेमाची स्टोरी फोडलीय. इम्तियाज अली दिग्दर्शित हा सिनेमा एका रोमान्टिक कथानकावर आधारीत आहे. या सिनेमाचं कथानक राधा - कृष्णाच्या अमरप्रेम कथेवर बेतलंय.
या सिनेमात दीपिका 'तारा'च्या भूमिकेत दिसतेय तर रणबीर 'वेद'च्या... वेद हा स्वत: आणि कुटुंबानं बनवलेल्या नितिमूल्यांच्या जाळ्यात अडकलेला पण स्वत:ला हरवलेला एक तरुण आहे... यामुळेच, जे त्याला करायचंय ते तो करू शकत नाही... तारा त्याच्या आयुष्यात येते आणि त्याची हकीगत त्याला लक्षात आणून देते... वेदला त्याच्या क्षमतांची नव्याने ओळख तारामुळे होते.
रणबीर म्हणतो, 'तारा आपल्या मूल्यांवर विश्वास ठेवणारी एक भारतीय मुलगी आहे... परंतु, तिची विचारसरणी मात्र आधुनिक आहे...'
'राधानं स्वत:चा त्याग यासाठी केला कारण ती कृष्णाच्या क्षमतांना ओळखते... त्यामुळेच ती त्याला म्हणते, तू जा... जो आहेस ते बनून दाखव... मी तुझ्यासाठी माझ्या प्रेमाचा त्याग करायला तयार आहे...' असं म्हणत इम्तियाजनंही 'आपण राधाच्या भूमिकेनं प्रेरीत झाल्याची कबुली दिलीय.
यावरून तुम्हाला 'तमाशा'मध्ये काय पाहायला मिळेल, याचा अंदाज एव्हाना आलाच असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.