मुंबई : बॉलिवूड अभिनेता किंग खान शाहरुख सध्या त्याची आगामी फिल्म 'फॅन'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या फिल्मचं 'जबरा फॅन' हे गाणं विविध भारतीय भाषांमध्ये रिलीज झालंय. याच दरम्यान तो कोणाचा फॅन आहे त्याचे खुलासेही तो करतोय. आत्तापर्यंत त्याने हे गाणं बंगाली, भोजपुरी, मराठी, पंजाबी, तामिळ आणि गुजराती भाषेत रिलीज केलं आहे.
त्याने हे गाणं जेव्हा गुजराती भाषेत रिलीज केलं तेव्हा आपल्या फॅन्सशी बोलताना त्याने ट्वीट केलं की 'गांधीजी, राष्ट्रपिता... देशातले सगळ्यात मोठे स्टार आहेत. संपूर्ण जग त्यांचं फॅन आहे.'
पंजाबी भाषेतील या गाण्याची लिंक टाकून शाहरुखने तो यश चोप्रांचा खूप मोठा फॅन असल्याचे म्हणाला. 'यशजी, तुम्ही ज्याप्रमाणे पंजाबी संस्कृती आणि परंपरा तुमच्या फिल्म्समध्ये दाखवलीत तशी ती कोणीच दाखवू शकले नसते. हे गाणं तुमच्यासाठी. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे.' याच गाण्याचे तामिळ व्हर्जन त्याने सुपरस्टार रजनीकांत यांना अर्पण केले.
अवधूत गुप्तेने गायलेले या गाण्याचे मराठी व्हर्जन रिलीज करताना शाहरुख म्हणाला की 'अंपायर काहीही म्हणो, पण तू (सचिन) माझ्यासाठी नेहमीच नॉट आऊट आहेस.' या गाण्याचे भोजपुरी व्हर्जन त्याने मनोज तिवारीला अर्पण केले आहे. ते गायलेही आहे मनोज तिवारीनेच.