मुंबई : असहिष्णुतेच्या वक्तव्यावरुन आमिर खानच्या मागे लागलेली साडेसाती काही करता संपण्याचं नाव घेताना दिसत नाही. आता यात भर पडलीये 'स्नॅपडील'ची. ऑनलाईन शॉपिंग कंपनी 'स्नॅपडील'ने आमिर खान सोबतचा आपला करार नव्याने न करण्याचा निर्णय घेतलाय.
यापूर्वी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने 'अतुल्य भारत'चा ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून आमिर खानसोबतचा करार नव्याने करण्यास नकार देऊन त्याजागी आमिताभ बच्चन आणि प्रियांका चोप्रा यांच्या नावाचा विचार केला गेला होता.
आमिरने केलेल्या वक्तव्यानंतर अनेकांनी तो ब्रँड अॅम्बॅसेडर असलेल्या स्नॅपडीलच्या अॅपचे रेटिंग कमी केले होते. काहींनी तर स्नॅपडील आपल्या फोनमधून अनइंस्टॉल करुन स्नॅपडीलवरुन काहीही खरेदी न करण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीला याचा जबरदस्त आर्थिक फटका बसला होता.
कंपनीने यानंतर आमिरच्या वक्तव्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. पण, तरीही वादावर पडदा पडत नव्हता. शेवटी आता कंपनीने आमिरसोबतचा करार नव्याने न करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या ब्रँड अॅम्बॅसेडरची अद्याप तरी निवड करण्यात आलेली नाही. पण, आमिर सोबतची 'दील की डील' स्नॅपडीलने आता रद्द केली आहे हे खरं.