तुरुंगात राहून संजयनं कमी केलं १८ किलो वजन!

पुण्याच्या येरवडा केंद्रीय तुरुंग प्रशासनाकडून बुधवारी दोन आठवड्यांसाठी सुट्टी मिळालेला अभिनेता संजय दत्त त्याच्या घरी दाखल झालाय. आपल्या घरी परतल्यानंतर संजयनं मीडियाशी संवाद साधला. यावेळी, आपणं तुरुंगात १८ किलो वजन घटवल्याचा उल्लेख त्यानं आवर्जुन केला. 

Updated: Dec 25, 2014, 04:36 PM IST


तुरुंगातून सुट्टीवर आलेला संजय दत्त 

मुंबई : पुण्याच्या येरवडा केंद्रीय तुरुंग प्रशासनाकडून बुधवारी दोन आठवड्यांसाठी सुट्टी मिळालेला अभिनेता संजय दत्त त्याच्या घरी दाखल झालाय. आपल्या घरी परतल्यानंतर संजयनं मीडियाशी संवाद साधला. यावेळी, आपणं तुरुंगात १८ किलो वजन घटवल्याचा उल्लेख त्यानं आवर्जुन केला. 

'माझं १८ किलो वजन कमी झालंय. यापेक्षा माझं वजन आणखी कमी झालं तर मीच आडवा होऊन जाईल' असं संजयनं यावेळी मजेशीरपणे म्हटलंय. संजय दत्त सध्या पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगतोय. या शिक्षेचे आता १८ महिने आता पूर्ण झालेत. 

यापूर्वी, ऑक्टोबर २०१३ मध्ये पत्नी मान्यता दत्त ही आजारी असल्या कारणानं तिची काळजी घेण्यासाठी २८ दिवसांकरता संजयला सुट्टी मिळाली होती. पत्नीचा आजार मोठा असल्याकारणानं संजय दत्तनं जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा २८ दिवसांची पॅरोल मागितली होती. तेव्हापासूनच वारंवार सुट्टीसाठी अर्ज करणाऱ्या आणि त्याला या सुट्ट्या मंजूर करणाऱ्यांवर टीकेचा भडीमार सुरू झाला होता. 

यावर बोलताना, मला कोणतीही विशेष सूट नकोय. मी पाच महिन्यांपूर्वी सुट्टीसाठी अर्ज केला होता. जो आता मंजूर झालाय. मला सहकार्य करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार, असं संजयनं म्हटलंय. 

संजय दत्तचा मित्र आणि सिने निर्माता राजकुमार हिरानी हा संजयच्याच जीवनावर एक सिनेमा बनवण्याचा प्रयत्न करतोय याबद्दल काही माहिती आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना आपल्याला याबद्दल काही माहीत नसल्याचं संजयनं म्हटलंय. याबद्दल आपण राजकुमार यांच्याशी नक्की बोलू... तुरुंगात राहून मी १० स्क्रिप्ट तयार केल्यात आणि लवकरच मला त्यावर काम सुरू करायचंय असंही संजय दत्तनं म्हटलंय. 

मुंबईमध्ये १२ मार्च १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्पोटांदरम्यान अवैध रुपात एके ५६ रायफल बाळगल्याप्रकरणी आणि ती नष्ट केल्याप्रकरणी संजय दत्त दोषी आढळला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दत्तनं १६ मे २०१३ रोजी आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर त्याला उच्च सुरक्षा असलेल्या येरवडा केंद्रीय कारागृहात पाठवण्यात आलं. या तुरुंगात त्यानं ४२ महिन्यांची शिक्षा पूर्ण केलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.