मुंबई : बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानच्या नव्या चित्रपटात एका मराठी मुलीला पदार्पणाची संधी मिळाली आहे. फॅन चित्रपटात शाहरूख खानची हिरोईन श्रेया असणार आहे. शाहरूख सारख्या एका सुपर स्टारसोबत काम करण्याचा अनुभव हा शिकण्यासारखा आणि अतिशय ग्रेट अनुभव होता असं श्रेयाने म्हटलं आहे.
श्रेया ही अभिनेता सचिन पिळगांवकर यांची मुलगी आहे. श्रेयाची भूमिका या चित्रपटात फार मोठी नसली तरी अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्याला आनंद होत असल्याचं सचिन पिळगावकर यांनी म्हटलं आहे. ती या चित्रपटात शाहरूखची हिरोईन असणार आहे, तिने या चित्रपटातली भूमिका साकारू का असं मला विचारलं होतं, मी तिला याबाबतीत संपूर्ण पाठिंबा दिला.
शाहरूख सारख्या अभिनेत्याबरोबर काम करतांना खूप काही शिकण्यासारखं आहे, त्य़ावर लक्ष केंद्रीत कर असंही मी तिला सांगितल्याचं सचिन पिळगांवकर यांनी म्हटलंय. दिग्दर्शक मनीष शर्मा म्हणाले, फॅन चित्रपटात शाहरूखचा डबल रोल असणार आहे, सुपर स्टार आर्यन खन्ना तसेच त्याचा सर्वात मोठा फॅन गौरवची ही भूमिका असेल.
सचिन पिळगांवकर आज ५८ वर्षाचे आहेत, सचिन यांनी २०१३ मध्ये एकुलती एक हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला होता, त्यात श्रेयाची मुख्य भूमिका होती.
मी तिला सांगितलं आहे, संधी सोडू नको, खूप मेहनत घे, चांगलं काम कर, तिला एकुलती एक सिनेमामधून अनुभव मिळाला आहे, तिच्यात एक चांगली नटी असल्याचं मला माहिती आहे, असंही पिळगावकर शेवटी म्हणाले.
निर्माता यश राज फिल्मस हा फॅन हा सिनेमा पुढील वर्षी १५ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.