मुंबई : अक्षय कुमारच्या ‘रूस्तम’कडे त्याच्या चाहत्यांप्रमाणेच बॉलिवूडकरांचंही लक्ष लागून राहिलं आहे. पण 12 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाला मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागणार आहे. कारण अभिनेता हृतिक रोशनचा ‘मोहेंजोदरो’ हा सिनेमाही याच दिवशी प्रदर्शित होत आहे.
प्रदर्शनापूर्वीच मोहेंजोदरोने आपले सॅटलाइट अधिकार विकून 45 कोटी कमवले आहेत. सिनेमासाठी एकूण 120 कोटी रूपये खर्च करण्यात आलाय. पण पहिल्या आठवड्यातच हा संपूर्ण खर्च वसूल होईल असं निर्मात्यांना वाटतंय.
इतिहासपूर्वकालीन सिंधू संस्कृतीवर आधारीत हा सिनेमा आहे. याचं दिग्दर्शन आशितोष गोवारीकर यांनी केलं असून हृतिक रोशन प्रमुख भूमिकेत आहे. यानिमित्ताने अभिनेत्री पूजा हेगडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. ए.आर.रेहमान संगीत दिग्दर्शक असल्याने फक्त गाण्यांतूनच या सिनेमाने 15 कोटी कमवले आहेत.
त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस कोण उतरेल ? अक्षय की हृतिक? रूस्तम की मोहेंजोदरो ? हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल.