रिअल लाईफ 'फॅन'मुळे शाहरुख येणार अडचणीत?

शाहरूख खानच्या फॅन चित्रपटात शाहरूखला फॅनचा कसा त्रास होतो, हे सगळ्यांनी पाहिले. मात्र, आता खऱ्या आयुष्यातही शाहरूखला दोन लहानग्या फॅनमुळं जबरा त्रास होणार आहे आणि याचं कारण ठरणार आहे त्याच्याच चित्रपटातील गाणं 'जबरा फॅन'...

Updated: Jul 1, 2016, 08:15 PM IST
रिअल लाईफ 'फॅन'मुळे शाहरुख येणार अडचणीत? title=

विशाल करोळे, औरंगाबाद : शाहरूख खानच्या फॅन चित्रपटात शाहरूखला फॅनचा कसा त्रास होतो, हे सगळ्यांनी पाहिले. मात्र, आता खऱ्या आयुष्यातही शाहरूखला दोन लहानग्या फॅनमुळं जबरा त्रास होणार आहे आणि याचं कारण ठरणार आहे त्याच्याच चित्रपटातील गाणं 'जबरा फॅन'...

...म्हणून ते जेवलेच नाहीत!

नबीर झैदी (7 वर्षे) आणि फ्लोरा झैदी (४ वर्षे)... किंग खानचे हे दोन लहान फॅन्स आता त्याला चांगलंच सतावणारेय... त्याचं कारणही तसंच आहे. फॅन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी  चित्रित केलेल्या 'हाय रे जबरा' गाण्याचे नबील आणि फ्लोरा जबरा फॅन झाले होते. आईच्या मागे लागून ते या चित्रपटाला गेले. मात्र, चित्रपटात 'हाय रे जबरा' गाणं दिसलंच नाही... 

त्यामुळं या दोन लहानग्या फॅनचा चांगलाच हिरमोड झाला. त्यांनी त्या दिवशी जेवायलाही नकार दिला. ही दोन्ही मुलं शाहरूखची जबरदस्त फॅन आहेत आणि आम्ही शाहरूख अंकलवर नाराज असल्याचं ते आवर्जून सांगतात.
  
त्यादिवशी अखेर अॅसिडिटीमुळं मुलांना दवाखान्यात न्यायची वेळ आईवर आली. या सगळ्या प्रकारामुळे झैदी कुटुंबीय मात्र चांगलेच वैतागले आणि चित्रपटातून ग्राहकांची फसवणूक केली, या भूमिकेतून त्यांनी थेट ग्राहक मंचात धाव घेतली तसंच नुकसान भरपाईचीही मागणी केली.

भरपाईची तक्रारदारांची मागणी

अफरीन फातिमा झैदी चित्रपट पहायला कुटुंबीयांसोबत गेल्या होत्या त्याचा खर्च १०५० रुपये... रिक्षा भाडं ५०० रुपये, मध्यांतरातील नाश्ता, कोल्ड्रिकचा खर्च १ हजार रुपये, चित्रपटात गाणी नसल्यानं रात्री मुलं जेवली नाही, त्यांना सकाळी अॅसिडीटी झाली त्यामुळं दवाखान्यात १ हजार रुपये, मानसिक त्रासापोटी २७ हजार रुपये आणि न्यायालयीन खर्च ३० हजार अशी ६०,५५० रुपयांची तक्रारदारांनी मागणी केलीय.

या प्रकरणी राज्य ग्राहक मंचाच्या औरंगाबाद खंडपीठानं  शाहरूख खान, आदित्य चोप्रा आणि चित्रपटातील संबंधितांना नोटीस पाठवलीय. यासंदर्भात २५ जुलैला सुनावणी होणार आहे.

याप्रकरणी आता नोटीस पाठवण्यात आलेल्या सगळ्यांनाच खुलासा करावा लागणार आहे. त्यामुळं प्रमोशनसाठी वापरलेलं गाणं चित्रपटात न दाखवणं एका फॅनच्या हट्टामुळं शाहरूख आणि कंपनीला चांगलंच अडचणीचं ठरणार, यात शंका नाही.