मुंबई: रमन राघव 2.0 या चित्रपटात काम करत असताना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकाला प्रचंड मेहनत करावी लागली होती. या मेहनतीमुळे शूटिंगदरम्यानच नवाजुद्दीन बेशुद्ध पडला होता. बेशुद्ध अवस्थेतही नवाजुद्दीन या चित्रपटाचे डायलॉग बोलत होता.
रमन राघव हा मनोरुग्ण सीरियल किलर होता. 1960 च्या दशकामध्ये मध्य मुंबईच्या गल्ल्यांमध्ये त्याची दहशत होती. अनुराग कश्यप यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन राघवची भूमिका करतो आहे.
आम्ही जवळपास 20 दिवस या चित्रपटाचं शूटिंग केलं. शूटिंगवेळी माझी तब्येत बिघडली, त्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मी हॉस्पिटलमध्ये जाताना बेशुद्ध झालो, तेव्हा पण मी या चित्रपटाचे संवाद बोलतं होतो, असं मला नंतर सांगण्यात आल्याची प्रतिक्रिया नवाजुद्दीननं दिली आहे.
राघवची ही भूमिका इतर भूमिकांपेक्षा वेगळी आहे. राघव तुमच्या आणि माझ्यासारखा विचार करत नाही, त्याची मानसिकता वेगळी आहे. ही भूमिका करताना मला प्रचंड मानसिक तणाव होता, असं नवाजुद्दीन म्हणाला आहे. 24 जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे. तर 11 मे ला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये फोर्टनाईट भागामध्ये हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.