मुंबई : मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांची मनं जिंकलेला नटसम्राट आता छोट्या स्क्रीनवर तुमच्या घरात पाहण्याची संधी तुम्हाला मिळतेय.
यावर्षी ब्लॉकबस्टर ठरलेला 'नटसम्राट - असा नट होणे नाही' हा सिनेमा लवकरच 'झी मराठी'वर पाहायला मिळणार आहे. नाना पाटेकर यांचा जबरदस्त अभिनय आणि महेश मांजरेकर यांचे उत्तम दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर येत्या ३१ जुलैला सायंकाळी ७ वाजता 'झी मराठी'वरून होत आहे.
तीन दशकांहूनही अधिक काळ मराठी रंगभूमी गाजवलेलं 'नटसम्राट' हे नाटक कायम ओळखलं गेलं ते यातील अभिनय, संवाद आणि अप्पासाहेब बेलवलकरांच्या शोकांतिकेसाठी... अभिनयाची कारकिर्द भरात असताना कायम प्रकाशझोतात राहणारा हा नट कालपरत्वे या प्रकाशझोतापासून दूर जातो आणि त्याच्या नशिबी येतात अंधाराच्या वाटा... त्याच्यावर भरभरून प्रेम करणारा रसिक प्रेक्षकच नव्हे तर त्याची स्वतःची मुलेही त्याला स्वतःपासून दूर करतात.
आपल्या लोकांशी आणि रंगभूमीशी नातं तुटलेला हा नटसम्राट आपल्या पत्नीसोबत या जगापासून दूर जात हलाखीचं जीवन जगतो त्याच्या याच शोकांतिकेची गाथा म्हणजे 'नटसम्राट' हे नाटक... याच नाटकावर आधारित ‘नटसम्राट’ चित्रपटामधून ही शोकांतिका रूपेरी पडद्यावर आली आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला. अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत बहुगुणी अभिनेते नाना पाटेकर, कावेरीच्या भूमिकेतील मेधा मांजरेकर यांच्या सोबतीला सुनिल बर्वे, अजित परब, नेहा पेंडसे आणि मृण्मयी देशपांडे या सर्वांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलसं केलं. याशिवाय अप्पासाहेबांच्या मित्राची भूमिका साकारणाऱ्या विक्रम गोखलेंच्या नव्या पात्राचीही समीक्षक आणि प्रेक्षकांनी प्रशंसा केली.
अप्पासाहेबांच्या भूमिकेकडे प्रत्येक अभिनेता शिवधनुष्य म्हणूनच बघतो आणि या भूमिकेचे कंगोरेही एवढे आहेत की ती प्रत्येकालाच साकारायला जमणं तसं अवघडंच... प्रसिद्धीच्या झोतात असताना चेहऱ्यावर येणारा तो रूबाब आणि ती रया गेल्यानंतर चेहऱ्यावर आलेली विषण्णता, जवळच्या लोकांनी दूर लोटल्यानंतर आयुष्यात आलेली हतबलता या सर्व गोष्टी समर्थपणे दाखवणं हे मोठं आव्हानचं... डॉ. लागू यांनी साकारलेली ही भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. हीच भूमिका तेवढ्याच ताकदीने आणि समर्थपणे रूपेरी पडद्यावर साकारली नाना पाटेकर यांनी...
नानांच्या या भूमिकेचं कौतुक सर्वच स्तरांतून झालं. नटसम्राटने अनेक पुरस्कार सोहळ्यांतही बाजी मारली. परदेशातही या चित्रपटाचे विशेष शोज् झाले आणि त्यालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. बॉलिवुडमधील अनेक दिग्गज कलाकारही हा चित्रपट बघून भारावून गेले. खुद्द अमिताभ बच्चन यांनीही अशा प्रकारची भूमिका हिंदीत करायला आवडेल अशी इच्छाही व्यक्त केली. एकंदरीत प्रेक्षक समिक्षकांनी भरभरून कौतुक केलेला आणि यावर्षी ब्लॉकबस्टर हिट ठरलेला हा चित्रपट येत्या ३१ जुलैला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.