मुंबई : पुण्यातील येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्त याची शिक्षा माफ करण्याचा अर्ज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी फेटाळला आहे.
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अभिनेता संजय दत्त सध्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी संजय दत्त याच्या शिक्षेला माफी द्यावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली होती. या मागणीला अनेक राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी तीव्र विरोध केला होता.
संजय दत्त सध्या ३० दिवसांच्या संचित रजेवर बाहेर आहे. संजयला शिक्षामाफी देण्याची मागणी करणारे पत्र मार्कंडेय काटजू यांनी राष्ट्रपतींनाही पाठविले होते. राष्ट्रपती कार्यालयाकडून ते केंद्र सरकारला पाठविण्यात आले. केंद्र सरकारने राज्य सरकारकडून अभिप्राय मागविला होता. राज्य सरकारने या प्रकरणी विचार करून संजयच्या सुटकेस याच महिन्यात विरोध केला केला. त्याचबरोबर त्याची सुटका न करण्याची शिफारस केली होती.
तुरुंगात असताना अनेक कैद्यांची वर्तणूक चांगलीच असते. त्यासाठी शिक्षामाफी देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.