नवी दिल्ली : 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमात 'पलक'ची भूमिका साकारणारा अभिनेता किकू शारदा याला बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर एक लाखांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. परंतु, फतेहबादला पोहचल्यानंतर कीकूला पुन्हा एकदा अटक करण्यात आलीय.
हरियाणा पोलिसांनी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांची नक्कल केल्याचं सांगत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केलाय. या तक्रारीवर पोलिसांनी किकूला अटक केलीय. पोलिसांनी ४० वर्षीय किकूला मुख्य न्यायिक मॅजिस्ट्रेट नंदिता कौशिक यांच्या न्यायालयात दाखल केलं. इथं त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हरियाणा पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केली होती. किकूला रिमांडमध्ये धाडल्यानंतर काही तासांनी सीजेएम कौशिकत यांनी त्याला एक लाखांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
पण, जामीन मंजूर झाल्यानंतर दिल्लीकडे जाणाऱ्या किकूला हरियाण पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा अटक केली. इथं किकूवर आयपीसीच्या कलम २९५ ए (धार्मिक भावनांना दुखावण्याचा) नुसार दुसरा एक गुन्हा दाखल होता. एसपी किशन मुरारी यांनी ही माहिती दिलीय. गुरुवारी एका स्थानीय न्यायालयात किकूला हजर केलं जाणार आहे.
२७ डिसेंबर रोजी प्रसारित झालेल्या कार्यक्रमात किकूनं 'मॅसेंजर ऑफ गॉड'फेम गुरमीत राम रहीमची नक्कल केली होती. याविरुद्ध डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांनी किकूविरुद्ध जोरदार आंदोलनही केली होतं.