'एआयबी'... करण, रणवीर, अर्जुनसहीत अश्लीलतेचा थील्लर नमुना!

आजच्या तरुणाईला अश्लिल भाषाच अधिक आकर्षित करते... असाच काहीसा भ्रम सिने इंडस्ट्रीतल्या तथाकथित नामवंत कलाकारांचा झालेला दिसतोय. 

Updated: Feb 3, 2015, 04:01 PM IST
'एआयबी'... करण, रणवीर, अर्जुनसहीत अश्लीलतेचा थील्लर नमुना! title=

मुंबई : आजच्या तरुणाईला अश्लिल भाषाच अधिक आकर्षित करते... असाच काहीसा भ्रम सिने इंडस्ट्रीतल्या तथाकथित नामवंत कलाकारांचा झालेला दिसतोय. 

नुकतीच, बॉलिवूडमधली काही सेलिब्रिटी म्हणवणारी मंडळी जमली होती ती एका खास शोसाठी... 20 डिसेंबरला मुंबईतील एका स्टेडियममध्ये या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोचं नाव आहे 'एआयबी' म्हणजेच 'ऑल इंडिया xxx'... खरं तर या शोचं संपूर्ण नाव उच्चारणंही तसं कठीणच... अश्लिल शेरेबाजीने समोरच्यांच्या टाळ्या मिळवणं एवढाच जणू यांचा उद्देश... करण जोहर, रणवीर सिंग, अर्जून कपूर हे या शोचे खास आकर्षण... विशेष म्हणजे यामध्ये दीपिका पदुकोण, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, अनुराग कश्यप यांसारख्या नामी हस्तींचाही समावेश होता...

कॉमेडी शोच्या नावाखाली सोशल साईट्सवरून ऑनलाईन जाहिरातबाजी करत तब्बल 4 हजार रुपये तिकीट दरानं या शोसाठी पैसे उकळण्यात आले. मात्र अश्लिल शेरेबाजी आणि शिव्यांचा भडिमार यातच रंगलेला हा शो आणि या अश्लिल शेरेबाजीला तितक्याच अतिउत्साहात दाद देताना ही कलाकार मंडळी दिसली.

पेज थ्री कल्चरचा नमुना पेश करणारा हा शो आणि त्यात सहभागी झालेले कलाकार आता गोत्यात येण्याची शक्यता आहे. ब्राह्मण समाज संघाने या शोवर तीव्र आक्षेप घेत साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय, अशी माहिती ब्राह्मण एकता संघाचे अध्यक्ष अखिलेश तिवारी यांनी दिलीय. 

राजकीय क्षेत्रातही या शोचे पडसाद उमटलेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबत कडक कारवाईची मागणी केलीयं.
 
यूट्यूब आणि व्हाट्सअपवर हे व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय झालेत. या शोचं आयोजन करणारांवर आणि त्यातल्या सहभागी कलाकारांची चौकशी करण्याचे आदेश सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.