फिल्म रिव्ह्यू : संवेदनांना घुसळून टाकणारा 'मसान'

Updated: Jul 24, 2015, 03:41 PM IST
फिल्म रिव्ह्यू : संवेदनांना घुसळून टाकणारा 'मसान'  title=

 

चित्रपट : मसान
दिग्दर्शक : वरुण ग्रोवर
कलाकार : रिचा चड्ढा, विक्की कौशल, श्वेता त्रिपाठी, संजय मिश्रा

मुंबई : 'मसान'... या शब्दाचा अर्थ आहे स्मशान घाट... काशीच्या घाटांवर जिथं माणसांवर अंतिम संस्कार केला जातो, ती जागा... इथं जळत्या जितांवर 'अखेर त्याची सुटका झाली' असं म्हटलं जातं. पण, याच धार्मिक वातावरणात केवळ जिवंत असणाऱ्यांचं काय?

कथानक 
सिनेमात दोन कहाण्या समांतर सुरू दिसतात. पहिली कथा आहे 'देवी'ची (रिचा चड्ढा)... आपल्या मित्रासोबत - पीयूषसोबत एका हॉटेलमध्ये असताना अचानक पोलीस या हॉटेलवर छापा मारतात. या घटनेत पीयूषचा मृत्यू होतो... ही घटना देवी आणि बनारच्या घाटांवर पूजा-अर्चना करणाऱ्या तिच्या पित्याचं (संजय मिश्रा) आयुष्यचं बदलून टाकते... आणि आपल्या आतील मरगळ झटकून देवी 'सुटकेचा' निर्णय घेते. 

दुसरी कथा आहे बनारसमध्येच राहणाऱ्या दीपकची (विक्की कौशल)... दीपकच्या कुटुंबातील आणि समाजातील लोक गंगा घाटावर मृत शरीरांना जाळण्याचं आणि अंतिम विधी पूर्ण करण्याचं काम करतात. पण, दीपक मात्र शिकून-सवरून सिव्हील इंजिनिअर होण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, कधी कधी कामातही तो आपल्या पित्याला आणि भावाला मदत करतो. पण, या अशा जगण्यातून बाहेर पडून चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्याचीही त्याला इच्छा आहे. यातच त्याची भेट शालूशी (श्वेता त्रिपाठी) होते. शालू आणि दीपिक यांची जात वेगवेगळी आहे. त्यामुळे त्यांची प्रेमकहानी सफल होणार नाही, हे त्यांनाही कळून चुकलंय... आणि होतंही तसंच... 

डायलॉग तर या सिनेमाचा 'यूएसपी'
वरुण ग्रोवरनं सिनेमाच्या डायलॉगमध्ये रंग भरलेत... या डायलॉगचं वैशिष्ट्यं म्हणजे ते अजिबात फिल्मी वाटत नाहीत. सिनेमाची गती आणि सिनेमातील संवेदना प्रेक्षकांना धरून ठेवण्यात यशस्वी होतात. 

सिनेमातली गाणी 
सिनेमाचे गीतही वरुणचं लिहिलेत. 'मन कस्तूरी रे... जग दस्तूरी रे... बात हुई ना पुरी रे...' यांसारखे गीत बॉलिवूडमध्ये अभावानंच पाहायला - ऐकायला मिळतील. पण, ही गाणी तुमच्या मनाच्या अंतरंगात दाखल होतात अशीच आहेत. 

कलाकार
बॉलिवूडमधल्या सिनेमांत हिरो-हिरोईन यांवरच फोकस करणारे सिनेमे अनेक पाहायला मिळतील. पण, या सिनेमाची खासियत म्हणजे या सिनेमात केवळ हिरो हिरोईनच नाहीत तर प्रत्येक पात्र तितकंच महत्त्वाचं आहे... अगदी नदीत उडी मारून पैसे काढणारा लहानगा 'झोंटा'देखील...

रिचा चड्ढा हिनंदेखील आपली भूमिका उत्तमरित्या पार पाडलीय. एका पित्याच्या रुपात संजय मिश्रानंही कमाल केलीय. पण, लक्षात राहते तो दीपकच्या भूमिकेतला विकी कौशल... 

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अवॉर्ड मिळालाय म्हणून हा सिनेमा पाहिला नाही तरी चालेल... पण, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं पाहायची इच्छा असेल तर हा सिनेमा जरूर पाहा... शेवटी इतकंच म्हणू शकतो... 'मसान पाहायला दोन वेळा जायला हवं... एकदा एकटं आणि दुसऱ्यांदा आणखी कुणासोबत' 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.