मुंबई : बॉलिवूडमध्ये मैलाचा दगड ठरलेला सिनेमा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’... शाहरुख खान आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा रोमान्टिक सिनेमा मुंबईतील ‘मराठा मंदिर’ या सिनेगृहातून खाली उतरणार आहे, असं म्हटलं जातंय. गेली 20 वर्ष सलग हा सिनेमा मराठा मंदिरमध्ये दिसतोय.
‘डीडीएलजे’ या शॉर्टफॉर्मनं सर्वपरिचित असलेला हा सिनेमा ऑक्टोबर 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून आजतागयत हा सिनेमा मराठा मंदिरमध्ये दाखवला जातोय. परंतु, यानंतर मात्र मराठा मंदिरचं बॉक्स ऑफिस ‘दिलवाले दुल्हनिया’साठी बंद होईल, असं म्हटलं जातंय. शाहरुख आणि काजोलच्या आणि या सिनेमाच्या प्रेमात पडलेल्या सिने-चाहत्यांसाठी ही एक निराशाजनक बातमी ठरू शकते.
‘मराठा मंदिर’चे व्यवस्थापक मनोज देसाई याबद्दल माहिती दिलीय. ‘हा सिनेमा सलग 900 आठवडे चालल्यानंतर आम्ही आणि यशराज प्रोडक्शननं 1000 आठवड्यांपर्यंत हा सिनेमा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 12 डिसेंबर 2014 रोजी या सिनेमाचे 1000 आठवडे पूर्ण होतील. यशराज प्रोडक्शननं होकार दिला तर आम्ही हा सिनेमा यापुढेही सुरु ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतो. पण त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही तर आम्हाला हा सिनेमा पडद्यावरून उतरवावा लागेल’ असं देसाई यांनी म्हटलंय.
आजही हा सिनेमा रविवारी हाऊसफूल होतो. मराठा मंदिरमध्ये या सिनेमासाठी तिकीट दर आहेत 15, 18 आणि 20 रुपये. सकाळी 11.30 वाजता डीडीएलजेचा शो सुरु होतो.
वर्ल्ड रेकॉर्ड बनविण्याचं लक्ष्य समोर ठेऊन हा सिनेमा इतकी वर्ष चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुरुवातीचे 500 आठवडे हा सिनेमा प्रॉफिटसाठी चालवला. यासाठी यशजी यांनी मराठा मंदिरच्या देसाई यांना सक्सेसफुल स्क्रिनिंगसाठी गोल्डन ट्रॉफीनं सन्मानितही केलं होतं. यानंतर मात्र यशराज आणि देसाई यांनी हा सिनेमा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ बनविण्याचा निर्णय घेतला होता.
येत्या 12 डिसेंबर रोजी या सिनेमाचे 1000 आठवडे पूर्ण होतील, जो एक रेकॉर्ड असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.