'दंगल' गर्लच्या फेसबुक पोस्टवर 'वादंग'

मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानच्या दंगल या सिनेमात बालपणीच्या गीता फोगटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री झायरा वसिमनं शनिवारी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली होती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 17, 2017, 11:21 AM IST
'दंगल' गर्लच्या फेसबुक पोस्टवर  'वादंग' title=

मुंबई : मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानच्या दंगल या सिनेमात बालपणीच्या गीता फोगटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री झायरा वसिमनं शनिवारी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली होती. या भेटीवर एक मोठा वर्ग नाराज झाला होता. झायरावर अनेकांनी सोशल मीडियावर टीका करण्यास सुरुवात केली होती. 

या ट्रोलमुळे दुखावलेल्या झायराने लगेचच सोशल मीडियाच्या माध्यमातून माफीनामा दिला होता. मात्र, तिने हा माफीनामा अवघ्या 3 तासातच आपल्या फेसबुक प्रोफाईलवरुन हटवल्याने अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

माफीनाम्यात झायराने दिलगिरी व्यक्त केली होती. मी नुकतेच ज्यांना भेटले, त्यांवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर मी ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांची जाहीर माफी मागते. मात्र, अनेकवेळा परिस्थितीच्या मागे कुणाचेच काही चालत नाही, हे समजून घेण्याची अपेक्षा व्यक्त करते असं तिनं म्हटलं होतं. 

तसंच मी १६ वर्षीय असल्याने, हे समजून माझ्यासोबत तसाच व्यवहार करावा. मी जे काही केले, त्यावर मी सर्वांची माफी मागते. कारण माझ्याकडून अनावधानाने चूक घडली. मला सर्वजण माफ करतील अशी अपेक्षा व्यक्त करते. तसंच आपल्याला कुणीही रोल मॉडेल समजू नये असंही तिनं म्हटलं होतं. 

झायराला सर्व स्तरातून पाठिंबाही मिळतोय. अभिनेत्री रेणुका शहाणे आणि गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनी तिला ट्विट करुन पाठिंबा दिलाय..