मुंबई : पुण्यातील एका महिलेने अभिनेते सचिन पिळगावर यांना ३५ लाखांना फसविल्याचे पुढे आले. आता फुलवा खामकर यांना १० लाखांना तर सचिन यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांना ५ लाखांना फसविल्याचे स्पष्ट झालेय.
कमी किमंतीत महागडी कार देण्याचे आश्वासन पुण्यातील एका स्मार्ट महिलेने दिले. त्यानुसार सचिन यांनी महिलेला ३५ लाख रुपये दिले. तिने त्याबदल्यात कारही दिली. सचिन यांनी गाडीची पूजा केली. मात्र, त्यानंतर गाडीचे आरटीओचे काम आहे. कागदपत्रे पुरी करायची आहेत, असे सांगून ती महिला कार घेऊन गेली ती परत आली नाही. तिला कॉल करुनही काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आपण फसले गेल्याचे सचिन यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसात तशी तक्रार केली.
माझी अनेक कंपन्यात ओळख आहे. त्यांच्या माध्यमातून बीएमडब्ल्यू कार सवलतीत घेऊन देते असे सांगून पुण्याच्या अनघा नावाच्या एका महिलेने अभिनेता सचिन पिळगावकरला ३५ लाख रुपयांना फसविले. सचिन पिळगावकर यानी तिच्याविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, फुलवा खामकरही नवीन गाडी घेण्याबाबत फसली. सचिनच्या वाढदिवशी कार घरी पाठवली त्या वेळी फुलवा खामकरही त्या ठिकाणी होती. सवलतीत कार मिळाल्याचे पाहून तीदेखील कार घेण्यास तयार झाली. तीनेही अनघाला दहा लाख रुपये दिले. तर सुप्रिया यांनीही जवळपास ५ लाख रुपयेही दिले होते. मात्र, त्यांनी याबाबत तक्रार केली नव्हती, अशी माहिती पुढे येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.