www.24taas.com, वॉशिंग्टन
‘हजारों जवाबों से बेहतर है मेरी खामोशी’ म्हणणाऱ्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या खामोशीवर प्रख्यात अमेरिकन वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’नेही टीकेची झोड उठवली आहे. मनमोहन सिंगच भारतातील भ्रष्ट सरकारचे प्रमुख आहेत, असा सनसनाटी आरोप ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केला आहे.
भ्रष्टाचाराबद्दल अनेकवेळा आरोप होऊनदेखील पंतप्रधान त्यावर कुठलंही स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत किंवा भ्रष्टाचाराला प्रतिबंध करणारी कुठलीही उपाययोजना पंतप्रधानांनी केली नाही. त्यामुळे स्वच्छ चारित्र्याचे असूनही पंतप्रधान हे निष्क्रिय असल्याची टीका वॉशिंग्टन पोस्टने केली आहे. पंतप्रधानांच्या मुकपणामुळे त्यांचं नेतृत्व अत्यंत प्रभावहीन ठरत आहे.
भारताला एकेकाळी संपन्नतेकडे नेणारे पंतप्रधान आता भारतीय इतिहासातील सर्वांत वाईट पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर आहेत. मनमोहनसिंग यांनी भारतात आर्थिक सुधारणेची धोरणं राबवली होती. पण आता मात्र पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द संपूर्णपणे प्रभावहीन ठरली आहे.असं वॉशिंग्टन पोस्टमधील लेखात लिहिलेलं आहे. यापूर्वी टाईम मासिकानेही मनमोहन सिंग यांच्या निष्क्रियतेवर टीका केली होती.
जागतीक पातळीवर आता भारतीय पंतप्रधानांची नाचक्की होत असताना काँग्रेस मात्र या आरोपांना खोटं ठरवत आहे. कोळसा कांडामुळे सध्या विरोधक पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राजीनामा मागत आहे. यूपीएच्या काळात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं, घोटाळे बाहेर आले आहेत.