अमेरिका निवडणूक : प्राथमिक फेरीत रिपब्लिकन, डेमोक्रॅट आघाडीला फटका

 अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सुरू असलेल्या प्राथमिक फेरीच्या निवडणुकीत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट पक्षांच्या आघाडीच्या उमेदवारांना फटका बसलाय. 

AP | Updated: Apr 6, 2016, 02:20 PM IST
अमेरिका निवडणूक : प्राथमिक फेरीत रिपब्लिकन, डेमोक्रॅट आघाडीला फटका  title=

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सुरू असलेल्या प्राथमिक फेरीच्या निवडणुकीत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट पक्षांच्या आघाडीच्या उमेदवारांना फटका बसलाय. व्हिस्कॉन्सिन राज्यात झालेल्या प्रिमियर्समध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.

ट्रम्प यांना टेड क्रूझ यांनी, तर क्लिंटनना बर्नी सँडर्स यांनी पराभवाची चव चाखायला लावलीये. ट्रम्प-क्लिंटन यांच्यासाठी व्हिस्कॉन्सिनची ही निवडणूक महत्त्वाची होती. या पराभवामुळे दोघांची आघाडी काही प्रमाणत घटलीये. क्रूझ आणि सँडर्स यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला असून पक्षाची उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलंय. 

दरम्यान, डॉनल्ड ट्रम्प यांची पत्नी मॅलेनिया यांनीही प्रायमरच्या प्रचारात उडी घेतलीये... मॅलेनिया पूर्वी मॉडेल होत्या. त्यामुळे त्यांचे अनेक कमी कपड्यांमधले किंवा विवस्त्र फोटो उपलब्ध आहेत... ट्रम्प यांचे कडवे प्रतिस्पर्धी टेड क्रूझ यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत मॅलेनिया यांचे हे फोटो व्हायरल केले होते. अशी महिला अमेरिकेची फर्स्ट लेडी झालेली चालेल का, असा क्रूझ यांच्या प्रचाराचा साधारण रोख होता.

एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी, या खास राजकारणातल्या तंत्राचा उपयोग करून आता ट्रम्प यांनी मॅलेनियांची प्रसिद्धी उपयोगात आणायचा निर्णय घेतलाय. त्यामुळेच व्हिस्कॉन्सिनमध्ये झालेल्या प्रायमरीजवेळी त्यांनी आपल्या पत्नीला प्रचाराच्या मैदानात उतरवलं. डॉनाल्ड राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी कसे योग्य आहेत, हे सांगताना मिलेनियांनी आपल्या भाषणात विशेषणांचा भडीमार केला. मात्र गेल्या काही दिवसांत वादग्रस्त विधानांमुळे ट्रम्प यांची आघाडी घटतेय. आता मॅलेनियांना प्रचारात उतरवल्यावर त्यांना काही फायदा होतो का, हे येत्या काही दिवसांत समजणार असलं तरी व्हिस्कॉन्सिनमधल्या पराभवामुळे सुरूवात तरी खराबच झाली आहे.