www.24taas.com, वॉशिंग्टन
सॅण्डी वादळानंतर आता पुन्हा अमेरिकेवर फिस्कल क्लिफ नावाचे नवे वादळ घोंघावत आहे. हे वादळ मात्र नैसर्गिक नसून मानवनिर्मितच आहे. या वादळावर अध्यक्ष बराक ओबामा यांनी पुढच्या दोन तीन दिवसांत उपाययोजना केल्या नाहीत तर अमेरिका आर्थिक मंदीच्या खाईत लोटली जाण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी तत्कालीन मरगळलेल्या अमेरिकी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी दहा वर्षांसाठीचे बहुविध सवलतींची खैरात असलेले आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. त्याची मुदत 31 डिसेंबर 2012ला संपुष्टात येत आहे. 2013च्या सुरूवातीलाच भरघोस करसवलती आणि सरकारला बेलगाम खर्च करण्याची मुभा असणा-या सर्व तरतुदी स्वयंचलित पद्धतीनं रद्दबातल ठरतील. आधीच नैराश्यग्रस्त असलेल्या अमेरिकेला हा दुहेरी फटका ठरेल म्हणूनच त्याला फिस्कल क्लिफ असे म्हटले आहे.
या आर्थिक अरिष्टावर तातडीन तोडगा काढला नाही तर प्रत्यक्ष अमेरिका आणि अप्रत्यक्षपणे सारे जग मंदीच्या गर्तेत खोलवर लोटले जाणार असल्याचे भीती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलीय. सर्व करसवलती काढून घेतल्य़ा तर त्याचे आर्थिकच नव्हे तर सामाजिक पडसादही उमटतील. त्यामुळं सर्वसहमतीनं ओबामा यांच्यापुढं पुन्हा दशवार्षिक पॅकेज मंजूर करून घेण्याचे मोठे आव्हान आहे.