www.24taas.com, झी मीडिया, कॉलोरेडो
वय केवळ सहा वर्ष... आपल्याच वयाच्या मुलीचा केला लैंगिक छळ... तुम्ही, म्हणाल कसं शक्य आहे हे? पण, हाच ठपका ठेवत या सहा वर्षांच्या विद्यार्थ्याला त्याच्या शाळेनं शाळेतून निलंबीत केलंय. अमेरिकेतल्या कॉलोरेडो इथल्या एका शाळेत ही घटना घडलीय.
हंटर येल्टॉन या सहा वर्षांच्या विद्यार्थ्यानं त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीच्या हाताचं चुंबन घेतलं होतं. हा प्रकार शाळा व्यवस्थापनाला समजताच त्यांनी हंटरला शाळेतून निलंबीत केलंय. ‘मला ती मुलगी खूप आवडते म्हणून वर्गात वाचनाचा तास सुरू असताना मी तिच्या हाताचं चुंबन घेतलं’ असं हंटरनं म्हटलंय.
त्यामुळे हंटरनं आपला गुन्हा कबूल केल्याचं सांगत शाळेन त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोप लावला आणि त्याला शाळेतून निलंबीत केलं. ‘हंटरचे वर्तन हे शाळेच्या लैंगिक छळाच्या व्याख्येत बसते. शाळेच्या नियमावलीनुसार मुलींना नकोसा वाटणारा स्पर्श हा लैंगिक छळ म्हणून समजला जातो’ असं म्हणत शाळेचे मुख्याध्यापक रोबीन गोल्डी यांनी या शिक्षेचंत समर्थन केलंय.
यावर हंटरच्या आई-वडिलांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ‘आपल्या मुलाला आता सेक्स, लैंगिक छळ या शब्दांचा अर्थदेखील कळत नाही... मग त्याच्यावर असे गंभीर आरोप करून त्याला शाळेतून निलंबित कसं केलं जाऊ शकतं’ असा प्रश्न हंटरच्या पालकांनी विचारलाय. संबंधित विद्यार्थीनीच्या पालकांनी मात्र, या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.