www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी 'विकासासाठी शांततेची आवश्यकता आहे' असं शरीफ यांनी नमूद केलं.
नवाझ शरीफ हॉटेल ताज मानसिंहमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते. 'विकासासाठी शांतता आवश्यक आहे. शांतिविना विकास अशक्य आहे आणि आपलं सरकार शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रतिबद्ध आहे' असं शरीफ यांनी यावेळी म्हटलं.
'नवी दिल्लीत येऊन मला खूप चांगलं वाटलं. ही एक ऐतिहासिक संधी होती. मोदींशी भेटही चांगली झाली. दोन्ही देशांना एकमेकांशी वाद घालण्याऐवजी सहकार्यावर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे. आमचं सरकार सगळ्याच मुद्द्यांवर चर्चेसाठी तयार आहे' असंही शरीफ यांनी म्हटलंय.
'लाहोर घोषणापत्रापासून पुढे सुरुवात करता येईल. वाजपेयींपासून अर्धवट राहिलेली गोष्ट पुढे नेता येईल' असं त्यांनी द्विपक्षीय नात्याबाबत म्हटलंय. नवाझ यांनी ईदच्या निमित्तानं मोदींना पाकिस्तान भेटीचं आमंत्रणही दिलंय. यावेळी दोन्ही देशांचा अजेंडा सारखाच असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
कशी झाली मोदी आणि शरीफ यांची भेट
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात हैदराबाद भवनमध्ये भेट दुपारी 12.45 वाजता भेट झाली.
नवाझ शरीफ यांचं आगमन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. यानंतर चर्चेला सुरूवात झाली.
यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या देखिल उपस्थित आहेत.
नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांची भेट ही भारत-पाकिस्तान यांच्यातील चर्चेचं एक नवं पर्व असल्याचं सांगण्यात येत आहे.
नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाला त्यावेळी नवाझ शरीफ आणि नरेंद्र मोदी यांची औपचारीक भेट झाली.
मात्र आता होणाऱ्या भेटीत नवाझ शऱीफ आणि नरेंद्र मोदी यांच्यात काश्मीर प्रश्नावर काय चर्चा होते, यावर सर्वांचं लक्ष आहे.
भारत-पाकिस्तान या दोन्ही देशात बंदीस्त असलेले कैद्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.