पेशावर : पाकिस्तानात बच्चा खान विद्यापीठावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. दहवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात २१ जणांचा बळी गेलाय. तर प्रतिक्रियेदाखल केलेल्या कारवाईत चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय.
विद्यापीठात घुसून दहशतवाद्यांनी ६० ते ७० विद्यार्थ्यांवर गोळीबार केल्याची पाकिस्तान मीडियाची माहिती आहे. हल्ला झाला तेव्हा विद्यापीठ परिसरात हजारो विद्यार्थी उपस्थित होते. कारवाईत चार दहशतवादी मारले गेले असले तरी ७-८ दहशतवादी अजूनही विद्यापीठात असल्याचं सांगण्यात येत आहे.
सकाळी धुकं असल्याने एकूण किती दहशतवादी विद्यापीठात शिरले याबाबत साशंकता असून लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु होते. तेहरीक-ए-तालीबान या दहशतवादी संघटनेनं हल्ला केल्याचा संशय आहे.
दुसरा मोठा अतिरेकी हल्ला
पेशावरमध्ये शैक्षणिक संस्थेवर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. १६ डिसेंबर २०१४ रोजी पेशावरच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये अतिरेकी घुसले. बेछूट गोळीबार आणि ग्रेनेडचे स्फोट घडवून त्यांनी तब्बल १० तास पाकिस्तानची सुरक्षा ओलिस ठेवली. या हल्ल्यात १४६ विद्यार्थी आणि शिक्षकांचा बळी गेला. या घटनेला वर्ष उलटत नाही तोच पुन्हा पेशावरजवळच्या बचा खान विद्यापीठावर आत्मघातकी हल्ला झाला.
Strongly condemn the terror attack at Bacha Khan University in Pakistan. Condolences to families of the deceased. Prayers with the injured.
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2016