www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पाकिस्तानी नागरिक असलेल्या एका महिलेनं तिच्या मुलाला भारताच्या भूमिवर जन्म दिला. पण, पाकिस्ताननं मात्र कागदपत्रांची मागणी करत या नवजात बालकाला पाकिस्तानात येण्यास बंदी घातलीय. यामुळे या महिलेवर मोठं संकटच कोसळलं.
फातिमा ही पाकिस्तानची नागरिक आहे. पण, तिचं माहेर मात्र राजस्थानच्या जैसलमेरमध्ये आहे. आपल्या मामाच्या मृत्यूनं धक्का बसलेल्या फातिमानं २३ फेब्रुवारी रोजी बाडमेरच्या रस्त्यानं पाकहून भारतात येणारी रेल्वे पकडली. यावेळी तिच्यासोबत तिची १२ वर्षांची मुलगी सकीना, ४ वर्षांचा मुलगा अरशद आणि भाचा मीर मोहम्मद हे तीन मुलंदेखील होते.
एका महिन्यासाठी भारतात आलेल्या फातिमाला २३ मार्च रोजी पाकिस्तानला परतायचं होतं. पण यावेळी ती गर्भवती होती आणि पोटात दुखू लागल्यानं तिनं आपल्या व्हिजाची तारीख ४ मेपर्यंत वाढवून घेतली. याचदरम्यान १४ एप्रिल रोजी जैसलमेरच्याच एका खाजगी हॉस्पीटलमध्ये तीनं एका मुलाला जन्म दिला.
त्यानंतर, २५ एप्रिल रोजी फातिमा आपल्या मुलांसोबत आणि भाच्यासोबत जोधपूरहून थार एक्सप्रेसमध्ये बसून पाकिस्तानला रवाना झाली. परंतु, फातिमाला झिरो पॉईंटवरच रोखण्यात आलं. नवजात बालकाची कागदपत्रं पासपोर्ट, व्हिजा नसल्यानं त्याला पाकिस्तानात प्रवेश देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.
त्यानंतर फातिमा पुन्हा जैसलमेरला परतलीय. आपल्या मुलाची आणि आपली ताटातूट तर होणार नाही ना? ही काळजी तिला सतावतेय. तिनं भारत आणि पाकिस्तान सरकारकडे या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.