www.24taas.com,
इस्लामविरोधी मानल्या गेलेल्या अमेरिकन सिनेमामुळे जगभरातील मुस्लिम समाज अमेरिकाविरोधी प्रदर्शन करत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना सत्य आणि अहिंसेचे पुढारी महात्मा गांधी यांची आठवण झाली आहे. ओबामा यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करताना महात्मा गांधींचा उल्लेख केला. 6 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीचे हे ओबामा यांचे हे शेवटचे आंतरराष्ट्रीय संबोधन होते.
ओबामा यांनी आपल्या भाषणात मारल्या गेलेल्या अमेरिकन लोकांना न्याय मिळवून देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर एखादा फालतू सिनेमा हिंसेचाराचं कारण बनू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं. पैगंबराचा अवमान करणाऱ्या लोकांचं भविष्य असू शकत नाही. आपल्या प्रेषिताची विटंबना झाल्यास त्यांची निंदा करणं अयोग्य नाही. पण हिंसाचार करणं चुकीचं आहे, असं ओबामा आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी महात्मा गांधींच्या उपदेशाचा उल्लेखही ओबामांनी केला. “या प्रसंगी ‘असहिष्णुता ही एक प्रकारची हिंसाच असून लोकशाहीच्या विकासाला बाधक आहे’ या महात्मा गांधींच्या शब्दांचं स्मरण केलं पाहिजे.”
ओबामा असंही म्हणाले, की हा व्हिडिओ केवळ मुस्लिम राष्ट्रांचाच नाही, तर अमेरिकेचाही अपमान आहे. कारण, अमेरिकेत ही मुस्लिम समाज आहे. आम्ही सर्व धर्माच्या लोकांचं स्वागत करतो. मात्र, तरीही या व्हिडिओवर बंदी घालण्यास ओबामांनी नकार दिला आहे. याचं कारण म्हणजे संविधानाने दिलेलं अभिव्यक्ती स्वतंत्र्य असं ओबामा म्हणाले.