www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
चीनमध्ये प्राण्यांवर दया माया दाखविली जात नाही, हेच दिसून येत आहे. चीनच्या उत्तरेकडील भागात तब्बल १०० भटक्या कुत्र्यांना जमिनीत जिवंत गाडल्याची घटना पुढे आलेय. हा प्रकार समजताच प्राणीप्रेमींचा संताप अनावर झालाय.
भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संघटनेने याबाबतची छायाचित्रे प्रकाशित केल्यानंतर चीनमध्ये खळबळ उडाली आहे. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने याबाबत वृत्त दिले आहे. तान नावाच्या महिलेने या भयानक प्रकाराची छायाचित्रे काढली आणि आपल्या काही मित्रांच्या मदतीने सिना वेईबो या संकेतस्थळाचे कार्यालय गाठले आणि छायाचित्रे दाखवली. त्यानंतर प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
100 पेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांना बुधवारी एका खड्डय़ात गाडले गेले होते. त्यामध्ये लहान पिल्लांचाही समावेश होता. या प्रकाराची माहिती मिळताच काही जणांनी घटनास्थळी धाव घेत दोरीच्या साहाय्याने त्या कुत्र्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे २० कुत्र्यांना वाचवण्यात यश आल्याचे तान हिने सांगितले. मात्र, हा आरोप स्थानिक प्रशासनाने फेटाळाय.
स्थानिक नागरिकांनी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबद्दल तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर काही कुत्र्यांना पकडून त्यांना एका ठिकाणी ठेवण्यात आल्याचेही प्रशासनाने सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.