ओस्लो : ‘राजकारणाच्या माध्यमातून आणि पंतप्रधान पद स्विकारून जर मी माझ्या देशाला काही देऊ शकत असेल, तर मी नक्कीच या पर्यायाची निवड करेन’ असं नोबल विजेती पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ती मलाला युसुफजाई हिनं म्हटलंय.
‘बीबीसी’ या वृत्तवाहिनीसोबत बोलताना मलालानं आपलं हे मनोगत व्यक्त केलंय. अमेरिकेत राहून शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण पंतप्रधानपदाकडे वाटचाल करू शकतो, असंही मलालानं सूचित केलंय.
अमेरिकेत अजून स्त्री राष्ट्राध्यक्ष पदावर आरुढ झालेली दिसलेली नाही... पण, पाकिस्तानमध्ये मात्र दोन वेळा स्त्री पंतप्रधान मिळाली, याचा आपल्याला अभिमान असल्याचंही मलालानं म्हटलंय. पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांनी हे पद दोन वेळा भुषवलंल, त्यांच्याकडूनच आपण प्रेरणा घेतल्याचंही तीनं म्हटलंय.
पाकिस्तानची मलाला युसुफजाई आणि भारतातील सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांना संयुक्तरित्या नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.
ऑक्टोबर २०१२ रोजी मुलींच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या मलालावर तालिबानी बंदुकधाऱ्यानं गोळी झाडली होती. मलाला ही आत्तापर्यंत नोबल पुरस्कार विजेत्यांमध्ये सर्वात लहान विजेती ठरलीय.
‘मला माझ्या देशाला पुढे न्यायचंय... माझाही देश प्रगत देश व्हावा आणि देशातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावं यासाठी मी प्रयत्न करेन’ असंही मलालानं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.