www.24taas.com, झी मीडिया, लंडन
संभाजी महाराजांनी १६८४ मध्ये गोव्याच्या पोर्तुगीजांवर स्वारी केली होती. या घटनेची नोंद इतिहासात असेलही. मात्र याच घडामोडी तत्कालीन वृत्तपत्रात बातम्या म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या.
त्यावेळच्या `लंडन गॅझेट`मध्ये या घटना वृत्तांत स्वरुपात छापून येत होत्या. या संदर्भातल्या दोन बातम्यांचे दस्तावेज अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या प्रणव महाजन यांच्या हाती लागले. त्यांनी ते पुण्यातल्या इतिहास संशोधकांना पाठवले आहेत. पोर्तुगिज मोंगलांना मदत करत असल्याचं लक्षात आल्यावर संभाजी राजांनी गोव्यात पोर्तुगिजांवर चढाई केली होती. काउंट दि ऑल्वर याच्याशी फोंडा किल्ल्याजवळ छत्रपती संभाजी राजांनी ही लढाई केली होती. गोव्यातील जनतेचं धर्मपरिवर्तन करणाऱ्या ख्रिस्ती राज्यकर्त्यांविरोधात याच सुमारास स्थानिक जनतेने बंड केलं होतं. या बंडखोर लोकांवर छत्रपती संभाजी राजांनी नियंत्रण मिळवलं होतं तसंच धर्मांतर झालेल्या अनेक हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात परत घेतलं होतं.
मराठ्यांच्या या ज्वलंत इतिहासाची नोंद लंडन गॅझेटमध्येही असल्याचं पुढे आलं आहे. यामुळे मराठ्यांच्या इतिहासाची नोंद युरोपमध्येही होत असल्याचं दिसून आलं आहे. इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर यांनी या घटनेवर प्रकाश टाकला आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.