www.24taas.com, स्वित्झर्लंड
लहान मुलांसाठी पौष्टीक खाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय ब्रॅन्ड ‘नेस्ले’ वादात अडकलंय. खाद्य उत्पादन बनवणारी जगभरातील सगळ्यात मोठ्या कंपनीच्या उत्पादनं बनविण्यासाठी ‘घोड्याच्या मासां’चा वापर केला जात असल्याचं उघड झाल्यानं एकच खळबळ उडालीय.
या खुलाशामुळे स्वित्झर्लंडच्या या कंपनीनं इटली आणि स्पेनच्या बाजारांमधून आपले रेडीमेड पास्ता परत मागविलेत. परंतू, त्यापूर्वीच कंपनीच्या काही उत्पानांमध्ये घोड्याचे डीएनए मिळाल्याचं स्पष्ट झालं होतं. जर्मनीतून आलेल्या मांसापासून बनलेल्या ‘नेस्ले’च्या या खाद्यपदार्थांमध्ये डीएने परीक्षणच्या माध्यमातून घोड्याचं मांस सापडल्याचं स्पष्ट झालंय.
या खुलाशानंतर जागतिक स्तरावर स्टोअर्स संचालकांची एकच धांदल उडालीय. खुद्द कंपनीनंही ही गोष्ट मान्य केलीय. कंपनीच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, या खाद्यपदार्थांत घोड्याचं मांस आहे परंतू त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. कंपनीच्या जर्मनीच्या सप्लायरनं पुरविलेल्या मालात त्यांना गडबड आढळून आलीय. यानंतर ‘नेस्ले’नं इटली आणि स्पेनमधून ‘बुईटोनी बीफ रेवियोली’ आणि ‘बीफ टॉर्टिलेनी’ या पदार्थांना परत मागवलंय.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गेल्याच आठवड्यात कंपनीनं दावा केला होता की त्यांच्या कोणत्याही खाद्यपदार्थांमध्ये घोड्याचं मांस नाही. परंतू, प्रकरणानं जोर पकडल्यानंतर कंपनीनं आपल्या सगळ्याच उत्पादनांचं पुन्हा एकदा परीक्षण करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय.
घोड्याचं मांस विकल्या जाण्याच्या या घटनेत आत्तापर्यंत १२ देशांचा समावेश झालाय. ब्रिटनमध्ये पोलिसांनी याच प्रकरणात तीन जणांना अटकही केलीय. तर जर्मनीच्या बाजारातूनही मांसाहारी फ्रोजन प्रोडक्टस हटवण्यात येत आहेत.