स्विस बँकेतील आणखी पाच भारतीय खातेधारकांची नावं जाहीर

स्वित्झर्लंड सरकारनं आपल्याकडे असलेल्या आणखीन पाच भारतीय बँक खाते धारकांची नावं जाहीर केली आहेत. खातेधारकांविरुद्ध भारतात करसंबंधी चौकशी सुरू आहे.

Updated: May 27, 2015, 11:03 AM IST
स्विस बँकेतील आणखी पाच भारतीय खातेधारकांची नावं जाहीर  title=

स्वित्झर्लंड : स्वित्झर्लंड सरकारनं आपल्याकडे असलेल्या आणखीन पाच भारतीय बँक खाते धारकांची नावं जाहीर केली आहेत. खातेधारकांविरुद्ध भारतात करसंबंधी चौकशी सुरू आहे.

इथल्या फेडरल चार्टरमध्ये प्रकाशित झालेल्या या नावांत उद्योगपती यश बिर्ला, जमीन व्यावसायिक पोंटी चड्ढा यांचा जावई गुरजीत सिंह कोचर, दिल्लीच्या महिला उद्योगपती रितिका शर्मा, मुंबईच्या सिटी लिमोजिन घोटाळ्यातील दोन व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे. चड्ढा यांची काही वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. 

भारतीय अधिकाऱ्यांनी या भारतीयांविषयी माहिती मागितल्यानंतर स्वित्झर्लंड सरकारनं ही नावं प्रकाशित केलीत. स्वित्झर्लंडचा कर विभाग, स्विस फेडरल टॅक्स अॅडमिनिस्ट्रेशननं (एफटीए) यातील बिर्ला आणि ब्लेसिंग अपैरल कंपनीच्या रितिका शर्मा यांच्याबद्दल काही माहिती भारत सरकारकडे याआधीच सोपवलीय. 

या पाच जणांशिवाय इतर दोन भारतीय... स्नेहलता साहनी आणि संगीता साहनी यांची नावंही सार्वजनिक करण्यात आलीत. या दोघींविरुद्ध भारतात चौकशी सुरू आहे. 

नावं प्रकाशित झालेल्या व्यक्तींना 'द्विपक्षीय सहायता'द्वारे आपल्याबद्दल माहिती भारतीय अधिकाऱ्यांना दिली जाऊ नये, असं वाटत असेल या भारतीयांनी येत्या ३० दिवसांच्या आत फेडरल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्टात याचिका सादर करावी, असं एफटीएनं जाहीर केलंय. तसंच त्या व्यक्तीला आपल्या पक्षात साक्षही सादर करावी लागेल. राजपत्रात प्रकाशित या नोटिशीद्वारे स्विस एफटीए संबंधित व्यक्तींना कायदेशीर उपयांची संधीही द्यायचा प्रयत्न करत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.